Akola Lok Sabha Constituency वाशिम : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Elections 2024) रणधुमाळी सध्या सुरू आहे. त्या अनुषंगाने जवळजवळ सर्वच राजकीय पक्षाने जोरदार तयारी केली असून प्रचार-प्रसार, सभा आणि मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी सुरु आहेत. तर कधीही मतदारसंघात दिसून न येणारे लोकप्रतिनिधी आता मतदारांच्या दारात आल्याचे बघायला मिळत आहे. अशातच वाशिम (Washim) जिल्ह्यातील रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघातील विद्यामन खासदार संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांचे पुत्र अनुप धोत्रे (Anup Dhotre) यांना उमेदवारी देण्यात आलीय.


मात्र, या लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय धोत्रे इतरवेळी मतदारसंघात फारसे दिसून न आल्याने त्याचे पुत्र आणि सध्याचे महायुतीतील भाजपचे (BJP) उमेदवार अनुप धोत्रे यांना प्रचार करताना अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागतो आहे. आज प्रचारदरम्यान अनुप धोत्रे यांनी मतदारसंघातील मतदारांच्या गाठीभेटी घेत असतांना स्थानिक नागरिकांनी थेट सवाल करत दहा वर्षांत काय काम केलेत, याचा लेखाजोखा मागितला आहे. त्यामुळे मतदारसंघाचा रोष या निमित्याने चर्चेचा विषय बनला आहे.  


पुन्हा तुम्हाला का मत द्यायचं? 


अकोला-रिसोड लोकसभा मतदारसंघाचे खासदार माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे पुत्र आणि भाजप लोकसभेचे उमेदवार अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांनी रिसोड आणि मालेगाव तालुक्यात प्रचार मोहीम हाती घेतली आहे. त्यांचे पिता संजय धोत्रे हे या भागाचे खासदार आहेत. तसेच ते केंद्रात मंत्री देखील होते. मात्र त्यांनी कायमच अकोला रिसोड लोकसभा मतदारसंघात रिसोड तालुका आणि मालेगाव तालुक्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.


परिणामी, आज प्रचारादरम्यान अनुप धोत्रे मतदारसंघात उपस्थित असताना स्थानिकांनी त्याच मुद्याला हात घालत आपला रोष व्यक्त केलाय. निधी वाटप करताना देखील जवळील पदाधिकारी आणि ठराविक गावांनाच निधी दिल्याची चर्चा मतदार संघात आहे. मालेगाव तालुक्यात कुठलेच नवीन उद्योग आले नाहीत. रस्ते, रोजगार, आणि सिंचनासह अनेक प्रश्न रिसोड आणि मालेगाव तालुक्यात कायम आहेत. असे असताना आम्ही पुन्हा तुम्हाला का मत द्यायचं, असा प्रश्नही गावकऱ्यांनी विचारला आहे.  


घराणेशाहीवर बोलणाऱ्या पक्षाने काय वेगळं केलं? 


अकोला-रिसोड लोकसभा मतदारसंघातील खासदार संजय धोत्रे यांची प्रकृती बरी नसल्याने भाजपकडून खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी मिळताच त्यांना प्रत्यक्ष प्रचाराचा मैदानात उतरावं लागलं. मात्र, वडिलांचा मतदारसंघात अकार्यक्षम कार्यकाळाचा रोष मतदारांनी त्यांना बोलून दाखवलाय. खासदार संजय धोत्रे यांनी मतदारसंघाकडे केलेल्या दुर्लक्षामुळे त्याचे पुत्र अनुप धोत्रे यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मालेगाव तालुक्यातील सुकांडा येथे अनुप धोत्रे प्रचारासाठी गेले असता त्यांना नागरिकांनी दहा वर्षात काय केले? तुमचे वडील खासदार असताना आमचे गाव दिसले नाही का? आता तुम्ही निधी दिल्याचे सांगता, त्यामुळे तुम्हाला आम्ही मतदान का करावे ? असा प्रश्न वजा जाब गावातील मदारांनी थेट उमेदवारांना विचारलाय.


याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. घराणेशाहीवर बोलणाऱ्या पक्षांनी पिता नंतर पुत्राना उमेदवारी देऊन घराणेशाही भाजप मध्ये नाही का, असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आलाय. तर भाजप हे मतदारांना गृहीत धरते असा आरोपही नागरिकांकडून करण्यात आले आहे. असे असताना नवंउमेदवार अनुप धोत्रे मतदारांना कशा पद्धतीने विश्वासात घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या