Supriya Sule: विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आज शिंदे गटातील महेश शिंदे (Mahesh Shinde) आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावरच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या आहेत की, ''मला आजचा गोंधळ पाहून धक्का बसला. कोणत्याही विधीमंडळात आणि तेही महाराष्ट्रात घडणं अत्यंत दुर्दैवी आहे. वैचारीक लढाईत सत्तेत असलेल्या आमदाराने दुसऱ्या पक्षाच्या आमदाराला धमकी देणं, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही.''


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याना लक्ष्य करत त्या म्हणाल्या की, जेव्हा भाजपच्या सहकाऱ्यांना खरचटलं तरी अमित शाह झेड प्लस सिक्युरीटी देतात. त्यामुळे आज मविआच्या लोकप्रतिनिधींना जी धमकी दिली गेली ती ट्रेलर अभी बाकी है, ते काहीही करु शकतात. त्यामुळे यांनाही झेड प्लस सिक्युरीटी द्यावी, अशी विनंती केंद्रीय गृहमंत्र्यांकडे करते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत त्या म्हणाल्या की, ''मी ज्या कुटुंबातून येते आमच्यावर अनेकदा वार झाले आहेत. पण आम्ही कधी एका शब्दाने उत्तर दिलं नाही.  यशवंतराव व पवारसाहेबांचे संस्कार आमच्यावर आहेत. कधी असं आमच्या मनातही येवू शकत नाही. पण काही लोक बोलतात त्याला काय म्हणायचं.''


महाराष्ट्राला आणि पुणे जिल्ह्याला एक पालकमंत्री द्या: सुळे 


सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ''मी देव पाण्यात घालून बसलेय. आमच्या महाराष्ट्राला आणि पुणे जिल्ह्याला एक पालकमंत्री द्या. मला अनाथ झाल्यासारखं वाटतंय. दोन महिने झाले पालकमंत्री नाही आहे. दादा होता तेव्हा दर शुक्रवारी हक्काने कुठल्याही पक्षाचा माणूस आला तरी काम व्हायचं.'' 


मुख्यमंत्री खूप गोंधळले आहेत: सुळे 


नगराध्यक्ष, सरपंच निवडीवर बोलता त्या म्हणल्या की, एका गोष्टीचं वाईट वाटतं आताचे मुख्यमंत्री खूप गोंधळले आहेत. लहान मुलं ज्या मित्रासोबत राहतात त्यांच्यासारखंच वागतात आणि बोलतात. त्याचा मित्र बदलला की तोही बदलतो. असंच महाराष्ट्राच्या राजकारणाचं सुरु आहे. संगत ठरवतेय तुमचा निर्णय काय. धोरण असं ठरत नाही. वैचारीक बैठक ही वैचारीक असते. मैत्री तुम्ही कोणाशीही करा, पण सरकारमध्ये इतकं यू टर्न घेणं बरोबर नाही. जेव्हा भाजपसोबत होते तेव्हा वेगळा निर्णय. मविआमध्ये वेगळा निर्णय. आता सध्या वेगळा निर्णय घेत आहेत.


इतर महत्वाची बातमी: 


धक्कादायक! महिलेची रुग्णालयाच्या बाथरुममध्ये प्रसुती, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील घटना
BMC : शिवसेनेला धक्का, मुंबई महापालिकेच्या कारभाराची CAG कडून ऑडिट होणार; देवेंद्र फडणवीसांची घोषणा