मुंबई: राज्याच्या आजच्या अधिवेशनाच्या दिवशी मुंबई महापालिकेच्या कारभारावरुन मोठी चर्चा झाली. मुंबई महापालिकेतील विविध कामांमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपच्या वतीनं करण्यात आला. त्यावर चौकशीचा निव्वळ फार्स करता येणार नाही, मुंबई महापालिकेचे CAG चे विशेष ऑडिट करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्य सरकारची ही घोषणा म्हणजे शिवसेनेसाठी धक्का असल्याची चर्चा आहे.
विधीमंडळाच्या आजच्या कामकाजाच्या दिवशी भाजपच्या अनेक सदस्यांनी मुंबई महापालिकेतील कारभारावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. महापालिकेमध्ये कोविड घोटाळा, रस्त्यांच्या बांधकामातील भ्रष्टाचार, आश्रय योजनेतील भ्रष्टाचार, व्हर्च्युअल क्लासरुमच्या निविदेतील भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करण्यात आले. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या कारभाराच्या चौकशीचा निव्वळ फार्स करता येणार नाही, कालबद्ध वेळेत या चौकशी करण्यास महापालिकेला सांगण्यात येईल असं राज्याचे उपमुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबई महापालिकेच्या कारभाराचे CAG कडून विशेष ऑडिट करण्यात येईल अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या स्वत:च्या कंपन्या, भाजपचा आरोप
मुंबई महापालिकेच्या कारभारावर आज चर्चा करताना भाजपच्या सदस्यांनी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कंपन्या सुरू केल्या असून त्या माध्यमातून ते कामं करतात असा आरोप केला. सदस्यांनी केलेल्या या आरोपांची नगरविकास विभागामार्फत कालबद्ध पद्धतीने चौकशी करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
व्हर्च्युअल क्लासरुमच्या निविदेत भ्रष्टाचाराचा आरोप
मुंबई महापालिकेच्या 480 शाळांमध्ये सुरू असलेल्या व्हर्च्युअल क्लासरुम निविदेमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत भाजप आमदारांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन देखील केलं.
मुंबई महापालिकेत 25 वर्षात 3 लाख कोटींचा घोटाळा, भाजप आमदाराचा आरोप
मुंबई महापालिकेत मागील 25 वर्षात 3 लाख कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला. विधीमंडळाचा पावसाळी अधिवेशनात सभागृहात बोलताना आमदार अमित साटम यांनी मुंबई महापालिकेतील तीन लाख कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचारावरुन सत्ताधारी शिवसेनेवर हल्लाबोल केला आणि या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी एरंगळ बीचवर बनलेल्या अवैध स्टूडिओचा मुद्दाही उपस्थित करुन त्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
मुंबईतील रस्त्यांच्या कामात घोटाळा, सीबीआय चौकशी करा, मिलिंद देवरांची मागणी
मागील पाच वर्षात मुंबईच्या रस्त्यांसाठी मुंबई महानगरपालिकेने तब्बल 12 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. मुंबईकरांचा पैसा लुटणाऱ्यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी केली आहे. मुंबईतील रस्त्यांच्या मुद्यावरून भाजपनंतर आता महाविकास आघाडीतील काँग्रेसनेही शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.