Girish Mahajan Profile in Marathi : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या लँडस्लाईड यशानंतर महायुती सरकारमधी मंत्र्यांचा शपथविधी आज (15 डिसेंबर) नागपुरात पार पडला आहे. या शपथिवधी सोहळ्यात भाजपकडून प्रथम क्रमांकाची शपथ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून हसन मुश्रीफ यांनी, तर शिवसेना शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील यांनी पहिल्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे महायुती सरकारमध्ये भाजपमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर बावनकुळे वरिष्ठ नेते असतील. राष्ट्रवादीमध्ये हसन मुश्रीफ, तर गुलाबराव पाटील हे शिंदे सेनेमध्ये नेते असतील. दरम्यान, यावेळी मंत्रीपदांमध्ये मोठा फेरबदल करण्यात आला असून तब्बल 19 चेहरे मंत्रीपदामध्ये नवीन चेहरे असणार आहेत. त्यामुळे एक प्रकारे महायुतीमध्ये मंत्रीपदामध्ये भाकरी फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे.
एबीव्हीपीचा कार्यकर्ता ते पुन्हा कॅबिनेट मंत्री
अशातच, भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेल्या गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. गिरीश महाजन यांनी ही आज नागपुरात पार पडलेल्या शपथिवधी सोहळ्यात मंत्री पदाची शपथ घेतली आहे. गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यातील ऐंशीच्या दशकातील राजकारणी आहेत. ते जामनेरचे विद्यमान आमदार आहेत. देवेंद्र फडणवीस (Girish Mahajan) यांच्या मंत्रिमंडळात (2014-19) ते जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण आणि महाराष्ट्र राज्याचे पाटबंधारे मंत्री होते. गिरीश महाजन हे जामनेर विधानसभा मतदारसंघाचे 14 व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य असून सलग साहव्यांदा ते काम करत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून महाजन यांनी एबीव्हीपीच्या माध्यमातून तळागाळातील कार्यकर्ता म्हणून राजकारणाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. दरम्यान, गिरीश महाजन यांचा राजकीय प्रवास तेवढाच खडतर राहिला आहे.
तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
महायुती सरकारमधील मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्र्यांचा ५ डिसेंबर रोजी शपथविधी पार पडल्यानंतर आज मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यात गिरीश महाजन यांनी देखील तिसऱ्यांदा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. गिरीश महाजन यांचा राजकारणात प्रवेश अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून झाला. त्यांनी १९८१ ते १९८३ या काळात जनरल सेक्रेटरी (जी. एस.), आर्ट्स, सायन्स व वाणिज्य महाविद्यालय, जामनेर (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) येथे पद भूषविले होते.
त्यानंतर त्यांनी १९८८ ते १९९० या काळात भारतीय जनता युवा मोर्चा, जामनेर तालुक्याचे तालुकाध्यक्ष म्हणून काम पहिले. त्यानंतर १९९० ते १९९३ या काळत तालुकाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, जामनेर तालुका हे पद भूषविले. तर १९९२ साली ते जामनेर ग्रामपंचायतचे सरपंच झाले. त्यानंतर १९९३ ते १९९५ या कालावधीत जळगाव जिल्ह्याचे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज केले
यानंतर १९९५ ते १९९९ या काळात ते जामनेर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले.
तसेच १९९५ ते १९९७ या काळात त्यांनी प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा आणि महाराष्ट्र प्रदेशचे कामकाज बघितले. तर १९९९ ते २००४ या काळात ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर २००४ ते २००९ या काळात तिसऱ्यांदा तर २००९ ते २०१४ या कालावधीत चौथ्यांदा आमदार झाले. त्यानंतर २०१४ ते २०१९ पाचव्यांदा आणि २०२४ मध्ये ते पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले.
तर महाजन यांनी २०१४ ते २०१९ या काळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले असून त्यात त्यांनी जलसंपदा, खारभूमी व लाभक्षेत्र विकास विकास, वैद्यकीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता (अतिरिक्त प्रभार) या खात्यांचा कार्यभार सांभाळला आहे. तर २०१४ ते २०१९ या काळात नाशिक, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कामकाज केले आहे. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा एकदा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
हे ही वाचा