मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Cabinet) यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. यावेळी अनेक बड्या नेत्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार आहे. दरम्यान, एकीकडे राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला असला तरी मंत्रिपद मिळाले नाही, म्हणून अनेक नेते नाराज आहेत. या नाराजांना समजवण्याचे दिव्य महायुतीच्या तिन्ही पक्षांपुढे असणार आहे. दरम्यान, नाराज नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अगदी आगळावेगळा फॉर्म्यूला आणला आहे. या फॉर्म्यूल्यामुळे ज्यांना मंत्रिपद मिळाले आहे, ते आनंदी झाले आहेत. तर दुसरीकडे ज्यांची संधी हुकली आहे, त्यांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत.
शिंदे यांनी आमदारांकडून लिहून घेतले शपथपत्र
मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या मंत्र्यांकडून एक प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाणार आहे. ज्या नेत्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली आहे, त्यांना फक्त अडीच वर्षे मंत्रिपद दिले जाईल. त्यानंतर हे मंत्रिपद सोडून द्यावे लागणार आहे. याबाबत प्रतिज्ञापत्रात नमूद केलेले असणार आहे. मंत्रिपदाच्या शपथविधीआधी शिवसेना पक्षाची एक बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांन्या ही माहिती दिलेली आहे. मंत्र्यांना त्यांनी पूर्वकल्पना दिलेली आहे.
अजित पवार यांनीही अडीच वर्षांच्या फॉर्म्यूल्याचे संकेत
दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील मंत्रिपद मिळालेल्या नेत्यांना फक्त अडीच वर्षांसाठीच या पदावर राहता येईल, असे संकेत दिले आहेत. त्यांनी पक्षाच्या एका कार्यक्रमात भाषणादरम्यान यावर भाष्य केलेले आहे. भाजपामध्ये मात्र हा फॉर्म्यूला पाळला जाणार की नाही, याबाबत अस्पष्टता आहे.
आठवले, भोंडेकर नाराज
दरम्यान, मंत्रिपद न मिळाल्याने काही नेत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. त्याचे पडसादही उमटायला सुरुवात होत आहे. शिवसेना पक्षात पहिला राजीनामा पडला आहे. मंत्रिपद न मिळाल्याने भंडारा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार भोंडेकर यांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. यासह महायुतीचा घटकपक्ष असलेल्या आरपीआय (आठवले गट) पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनीदेखील जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला एका कॅबिनेट मंत्रिपद आणि एका विधानपरिषदेचे आश्वासन देण्यात आले होते. प्रत्यक्ष मात्र काहीच मिळालेले नाही. मी माझ्या पदाधिकाऱ्यांना कसे सामोरे जाणार, अशी खंत आठवले यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा :