मुंबई: मुंबई शहर आणि उपनगर परिसरात सोमवारी झालेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली. उपनगरातील घाटकोपर परिसरात छेडा नगर येथे एक महाकाय लोखंडी होर्डिंग (Ghatkoper Hoarding) शेजारी असलेल्या पेट्रोल पंपावर कोसळले. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर नेहमीप्रमाणे घटनास्थळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नेत्यांची रीघ लागली होती. यावेळी ईशान्य मुंबई लोकसभेचे उमेदवार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) आणि भाजपच्या मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांच्यात वाद झाला. या भावी खासदारांमध्ये जुंपलेल्या भांडणाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
संजय दिना पाटील हे ईशान्य मुंबईतील ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार आहेत. तर मिहीर कोटेचा यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. काल दुर्घटना घडल्यानंतर या दोघांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघेही एकाचवेळी घाटकोपरमध्ये पोहोचले. त्यावेळी संजय दिना पाटील यांनी बचावकार्य सुरु असलेल्या ठिकाणी कॅमेरा नेण्यावरुन मिहीर कोटेचा यांना सुनावले. काम करणारे लोक आहेत ना? तुम्हाला आतमध्ये जायला कोणी सांगितलं, आतमध्ये रेस्क्यू टीम बचावकार्य करत आहे. मग तुम्हाला फक्त कॅमेरा घेऊन आत कशाला जायचे आहे?, असा सवाल संजय दिना पाटील यांनी मिहीर कोटेचा यांना विचारला. प्रशासनाला बचावकार्य करु द्या, आतमध्ये जाऊन कामात अडथळा आणू नका, असे संजय दिना पाटील यांनी म्हटले.
आतापर्यंत ढिगाऱ्याखालून १४ मृतदेह बाहेर काढले
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत लोखंडी सांगाडा पेट्रोल पंपावर कोसळला. यावेळी पेट्रोल पंपाच्या परिसरात उभे असलेले लोक आणि वाहने त्याखाली दबली गेली. कालपासून बचाव पथकांकडून लोखंडी होर्डिंगच्या ढिगाऱ्याखालून जखमींना बाहेर काढले जात आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक असण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी महाकाय होर्डिंग पूर्णपणे उचलण्याची गरज आहे. त्यासाठी आता तयारी सुरु आहे.
500 टन वजनाच्या क्रेनच्या सहाय्याने आता मधले दोन गर्डर उचलले जाणार आहेत, त्याखाली काही माणसं अडकली असण्याची शक्यता आहे ती पडताळून बघितली जाणार आहे, सध्या दोन NDRF च्या टीम या ठिकाणी काम करत आहेत, अशी माहिती NDRF असिस्टंट कमांडर निखिल मुधोळकर यांनी दिली.
आणखी वाचा