Amey Wagh :  पुण्यासह (Pune) महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यात चौथ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडली. यावेळी पुण्यात अनेक कलाकार मंडळींनी देखील मतदान केल्याचं पाहायला मिळालं. मृणाल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, सुबोध भावे, प्रवीण तरडे, अमेय वाघ यांसारख्या अनेक कलाकारांनी संबंधित मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. या सर्व कलाकार मंडळींनी त्यांचे मतदानाचे फोटो सोशल मीडियावरही शेअर केले. पण या सगळ्यात अमेय वाघच्या (Amey Wagh) पोस्टने मात्र लक्ष वेधून घेतलं. 


इतर कलाकारांप्रमाणे अमेयने देखील त्याचा मतदानाचा हक्क बजावला. अमेयने पुण्यात मतदान केलं. तसेच त्याने त्याचा फोटो सोशल मीडियावरही शेअर केला आहे. पण त्याच्या या पोस्टला अमेयने एक हटके पण तितकचं विचार करायला भाग पाडणारं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या या कॅप्शनची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. 


अमेयने पोस्टमध्ये काय म्हटलं?


अमेयने त्याच्या इन्स्टाग्रामवर ही पोस्ट केली आहे. यामध्ये अमेयने त्याचा मतदानाचा फोटोही शेअर केलाय. याला अमेयने कॅप्शन देत म्हटलं की, आता कोणीही कुठल्याही पक्षात जावं आणि कोणीही कोणाही बरोबर युती करावी ह्यासाठी मी आज परवानगी देऊन आलो ! सध्या अमेयच्या या कॅप्शनची चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. 






पुण्यात पार पडली मतदान प्रक्रिया


राज्यात चौथ्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं. त्यात पुणे,शिरुर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातीलदेखील मतदानाची प्रक्रिया पार पडली. मात्र या मतदानाला पुणेकरांनी थंड प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. पुणे लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 44.90 टक्के मतदानाची नोंद झाली. शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये सायंकाळी 5  वाजेपर्यंत 43.89 टक्के मतदानाची नोंद झाली. मावळ लोकसभा मतदार संघामध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत 46.03 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.  सकाळच्या सुमारास पुणेकरांनी मतदानासाठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी पुणेकरांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. त्यानंतर दुपारीदेखी पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. पण त्यानंतर मात्र पुण्यात मतदानाचा वेग मंदावला आणि पुण्यात एकूण 49.43 टक्के मतदान झालं आहे.  e


ही बातमी वाचा : 


Pravin Tarde : 'मतदानाच्या गर्दीनेच पुण्याचा निकाल स्पष्ट केलाय', मोहोळांची सभा गाजवल्यानंतर मतदानादिवशीच प्रवीण तरडेंनी वर्तवला निकालाचा अंदाज