मुंबई : मुंबईतील मतदान तर संपलं, पण एकीकडे मुलगा ठाकरे गटाच्या शिवसेनेचा उमेदवार असताना वडिलांनी मात्र वेगळी भूमिका घेत शिंदे गटाच्या उमेदवाराचा प्रचार केल्यानं उत्तर- पश्चिम मुंबईतील लढत चांगलीच गाजली.  गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) आणि अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांच्यातील या वेगवेगळ्या राजकीय भूमिकांवर मेघना कीर्तिकरांनी (Meghana Kirtikar) रोखठोक भाष्य केलंय. अमोलच निवडून येणार असं त्या म्हणाल्या. हा शिंदे आमच्याकडे कितीदा यायचा, त्याला गजानन कीर्तिकरांनी सलाम ठोकणं मला बरोबर वाटत नाही असं मेघना कीर्तिकर म्हणाल्या. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. 


हा शिंदे आमच्याकडे कितीदा यायचा


मेघना कीर्तिकर म्हणाल्या की, माझा पाठिंबा अमोलला आहे. गजानन कीर्तिकरांची भूमिका आणि विचार वेगळा आहे. गजानन कीर्तिकरांनी वेगळी भूमिका घेतल्याचं मला आवडलं नाही. हे काही बरोबर केलं नाही असं त्यावेळी मी त्यांना बोललेदेखील. आपण हातचं काही ठेवत नाही. जे पटत नाही ते सांगायला काय भीती. हे राजकारण आहे, त्यामुळे प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. हा शिंदे आमच्याकडे कितीदा येत होतो, गजानन कीर्तिकरांपेक्षा तो किती लहान आहे. आज त्याला तुम्ही सलाम ठोकणार हे काही बरोबर वाटत नाही. ज्यांनी त्यांनी आपल्याला परवडेल ते करावं. 


गजानन कीर्तिकर अमोलला मतदान करतील


गजानन कीर्तिकरांचा त्यांना आशीर्वाद आहे का असं विचारल्यावर मेघना कीर्तिकर म्हणाल्या की, त्यांनी कमीत कमी आशीर्वाद तरी द्यावा. आशीर्वाद तर त्यांना द्यावाच लागेल आणि मतही ते देतील. अमोल चांगल्या मतांनी निवडून येईल, माझी देवी त्याच्या पाठीशी आहे. मी आधी प्रचाराला जायची, कोपरा सभा घ्यायची. पण आता तब्येतीमुळे मला प्रचार करता आला नाही. पण अमोलच निवडून येईल. 


अमोल कीर्तिकर वि. रवींद्र वायकर लढत


उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभेसाठी मतदान पार पडलं असून या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर या दोन शिवसैनिकांमध्ये लढत आहे. अमोल कीर्तिकरांचे वडील खासदार गजानन कीर्तिकरांनी मात्र रवींद्र वायकर यांचा प्रचार केला आहे. त्यामुळे या ठिकाणची लढत अधिकच रंगल्याचं दिसलं. 


ही बातमी वाचा: