Bhiwandi Lok Sabha Election 2024 : भिवंडी शहरामध्ये सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या मतदानात सायंकाळी काही ठिकाणी वादंग होत गालबोट लागले आहे. खंडूपाडा बाला कंपाउंड मिलत नगर येथील अल्पसंख्यांक बहुल असलेल्या या मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याच्या आरोप करण्यात येत होता. परिणामी, भाजप उमेदवार कपिल पाटील (Kapil Patil) यांच्याकडे या संबंधित तक्रार गेल्यानंतर त्यांनी स्वतः या मतदान केंद्राला भेट दिली. त्यानंतर संतप्त कपिल पाटील यांनी निवडणूक अधिकारी तसेच उपस्थित पोलि‍सांना धारेवर धरत एकच गोंधळ घातला. यावेळी मतदान केंद्र परिसरात उभे असलेल्या नागरिकांच्या घोळक्याला बाहेर हाकलून लावण्याची मागणीही त्यांनी केली आणि मग स्वत:च पुढाकार घेत या मतदान केंद्रावरील गर्दी बाजूला केली


अनेक मतदान केंद्रावर बोगस मतदान- कपिल पाटील


परिसरातील अनेक मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याच्या तक्रारी यावेळी कपिल पाटील यांनी केल्या आहे. तसेच काही ठिकाणी बोटावरील शाई पुसण्यासाठी केमिकल घेऊन बसल्याचे देखील दिसून आल्याचा आरोप पाटील यांनी केलाय. लोकशाही वाचवायला निघालेलेच लोकशाहीची हत्या करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संबंधित प्रशासनाने वेळीच याची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणीही भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी केली आहे.


आयुष्यभर ज्यांनी जनतेला धमकावलं तेच लोकशाहीची हत्यारे -सुरेश म्हात्रे


तर दुसरीकडे भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा (Balya Mama) यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून आपला पराभव दिसत असल्याने  कपिल पाटील असे प्रकार करत असल्याचे मत सुरेश म्हात्रे यांनी व्यक्त केले. सकाळपासून मतदारांनी मतदानासाठी दाखवलेला उत्साह ही विजयाची नांदी असून कपिल पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.


त्यांनी दुपारी आपला पराभव मान्य केला आहे. त्यामुळे त्याचे खोटे आरोप करून मतदान जाणून-बुजून बंद पाडण्याचा प्रयत्न ते करत असल्याचे सुरेश म्हात्रे म्हणाले. ज्यांनी आयुष्यभर सर्वसामान्यांना धमकावलं त्यांनीच खऱ्या अर्थाने लोकशाहीची हत्या केली असून आम्ही संविधान वाचवण्यासाठी लढत असल्याचा प्रत्युत्तर महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बाळ्या मामा म्हात्रे यांनी दिले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या