G-20 Summit: जी 20 परिषदेच्या तयारीसंदर्भात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात ही बैठक पार पडली आहे. सर्वपक्षीय बैठकीला संरक्षण मंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित होते.
या बैठकीला इतरही अनेक नेते उपस्थित होते. यामध्ये सीताराम येचुरी, चंद्राबाबू नायडू, एमके स्टॅलिन, जगन मोहन रेड्डी, डी राजा, निर्मला सीतारामन, एस जयशंकर, पीयूष गोयल, मल्लिकार्जुन खर्गे आणि एचडी देवेगौडा यांचा समावेश होता. पुढील वर्षी 2023 मध्ये जी 20 शिखर परिषद भारताकडून आयोजित केली जाणार आहे. ज्यासाठी केंद्र सरकारने सूचना मागवण्यासाठी, रणनीतींवर चर्चा करण्यासाठी आणि अंतिम निर्णय घेण्यासाठी सोमवारी बैठक बोलावली होती.
बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी सर्व राजकीय पक्षांना भारताच्या जी 20 अध्यक्षपदासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "कोणत्याही पक्ष किंवा व्यक्तीसाठी नव्हे तर भारतासाठी मिळालेला हा सन्मान आहे. हा प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे. त्यामुळे आपण सर्वांनी सहकार्याने काम केले पाहिजे." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत सांगितले की, भारताचे जी 20 अध्यक्षपद संपूर्ण देशासाठी आहे, जगाला आपली ताकद दाखवण्याची ही एक चांगली संधी आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या चार ठिकाणी जी 20 च्या 14 बैठका होणार
जी 20 च्या परिषदेनिमित्त राज्याला जगासमोर प्रदर्शित करण्याची संधी मिळणार असल्याची प्रतिक्रिया बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या चार ठिकाणी जी 20 च्या 14 बैठका होणार आहेत. यानिमित्त राज्याचे ब्रॅण्डीग, राज्यातील विकासाचे प्रकल्प, आपली संस्कृती, जगासमोर मांडण्याची संधी लाभली आहे. या दृष्टीने राज्यात गतीने कामे सुरू असल्याचेही ते यावेळी म्हणाले.