Telangana CM KCR in Chandigarh: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे पंजाब दौऱ्यावर आहेत. रविवारी चंदीगडमध्ये त्यांनी गलवान खोऱ्यातील संघर्षात शहीद झालेल्या सैनिकांना आणि गेल्या वर्षी शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. येथे जनतेला संबोधित करताना केसीआर म्हणाले की, शेतकऱ्यांना हवे असल्यास सरकार बदलू शकतात आणि जोपर्यंत त्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव मिळण्याची घटनात्मक हमी मिळत नाही, तोपर्यंत त्यांनी लढत राहावे.


वर्षभर चाललेल्या आंदोलनाचा संदर्भ देत चंद्रशेखर राव म्हणाले की, शेतकऱ्यांच्या संयम आणि निर्धाराला मी सलाम करतो. आंदोलक शेतकऱ्यांना खलिस्तानी, दहशतवादी असे म्हणण्यात आले. शेतकरी नेत्यांना माझी एकच विनंती आहे की, आपण हे आंदोलन फक्त पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातच नाही, तर देशभर सुरू ठेवावे. शेतकऱ्यांना हवे तर सरकार बदलू शकतात. ही काही मोठी गोष्ट नाही. शेतकऱ्यांना रास्त भाव आणि त्याची घटनात्मक हमी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवावे.


केजरीवाल आणि भगवंत मानही होते उपस्थित 


तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य लढ्यात आणि कृषी क्षेत्रातील हरित क्रांतीमध्ये पंजाबच्या योगदानाचेही कौतुक केले. राव म्हणाले, 'पंजाब हे महान राज्य आहे.' राव यांच्यासोबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान देखील उपस्थित होते. केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव येथे आले होते. दिल्लीच्या सीमेवर झालेल्या आंदोलनात 700 हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.


दरम्यान, केसीआर हे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध तिसरी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. ते देशभरातील वेगवेगळ्या राज्यांना भेट देऊन तेथील स्थानिक पक्षातील विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेत आहेत. यातच त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही भेट घेतली आहे. तसेच याआधी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली आहे.