Raj Thackeray-Uddhav Thackeray मुंबई: विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर सडकून टीका केल्यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कौटुंबिक कार्यक्रमात ताज लँड्स एन्ड या हॉटेलमध्ये काल एकत्र आले होते. राज ठाकरे यांनी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांचा मुलगा शौनक पाटणकर यांच्या लग्नात हजेरी लावली.
रश्मी ठाकरे यांनी स्वतः राज ठाकरेंचं स्वागत केलं-
रश्मी ठाकरे यांनी स्वतः राज ठाकरेंचं स्वागत केलं. मात्र उद्धव आणि राज ठाकरे यांची थेट भेट थोडक्यात हुकली. उद्धव ठाकरे यांच्यावर टोकाची टीका केल्यानंतरही राज ठाकरेंनी लग्नाला उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. काल नागपूरात मंत्रिमंडळाचा विस्तार असताना मुंबईत ठाकरे कुटुंब एकत्र आले होते. राज ठाकरे आणि उद्धव एकत्र यावे अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. दरम्यान राज ठाकरे यांनी पाटणकर कुटुंबियांच्या निमंत्रणाला मान देत लग्नाला हजेरी लावली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे आज संध्याकाळी 5 वाजता पुणे शहरातील पक्ष कार्यालयात भेट देणार आहेत. पक्ष कार्यालयात महिला पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे भेट घेणार आहेत.
महापालिकेच्या निवडणुकीत मनसे महायुतीमध्ये सामील होणार?
आपण भाजपासोबत राहायला पाहिजे, भाजपाला आपण मदत केली आहे. महायुतीला लोकसभेत मदत केली आहे. निकाल आत्ता आपल्या बाजूने आला नाहीये. पण त्यांच्यासोबत राहून आपला पुढचा प्रवास केला पाहिजे असं मत बैठकीमध्ये आलेल्या नेत्यांचं होतं. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला सोबत घेण्याचा विचार आहे, हे स्पष्ट केल्यानंतर, दोघांच्या विचारधारा एकच आहेत. त्यात विचारधारेचे पक्ष एकत्र आले तर, आगामी महापालिका निवडणुकीत त्याचा मोठा परिणाम दिसू शकतो. देवेंद्र फडणवीस यांचा वक्तव्य समोर आल्यानंतर सर्वजण सकारात्मक असल्याच्या चर्चा आहेत. राज ठाकरे देखील याबाबत सकारात्मक असल्याचं बोललं जात आहे, जर या दोन्ही नेत्यांमध्ये बोलणे झाली तर ते सोबत पुढे जातील अशी शक्यता अनेक जण वर्तवत आहेत.