Rahul Gandhi in Chintan Shivir: काँग्रेसमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार, भाजप-आरएसएसमध्ये तसे नाही: राहुल गांधी
Rahul Gandhi On BJP-RSS: निवडणुकीतील सततच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील उदयपूरमध्ये काँग्रेसने चिंतन शिविराचे आयोजन केले होते. या तीन दिवसीय चिंतन शिबिरात सर्व बड्या नेत्यांनी सहभाग घेतला.
Rahul Gandhi On BJP-RSS: निवडणुकीतील सततच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील उदयपूरमध्ये काँग्रेसने चिंतन शिविराचे आयोजन केले होते. या तीन दिवसीय चिंतन शिबिरात सर्व बड्या नेत्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी शेवटच्या दिवशी पक्षाच्या नेत्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी भाजप आणि आरएसएस यांच्यावर हल्ला चढवला आहे.
भाजप-आरएसएसमध्ये संवादाची संधी नाही : राहुल गांधी
राहुल गांधी म्हणाले आहेत की, काँग्रेसच्या या शिबिरात झालेली चर्चा पाहून मला प्रश्न पडतो की, देशात असा कोणता पक्ष आहे, ज्यामध्ये अशी खुली चर्चा आणि संवाद होतो. भाजप आणि आरएसएस अशा गोष्टींना कदापि परवानगी देणार नाही. आपले अनेक नेते भाजपमधून पक्षात दाखल झाले आहेत. यशपाल आर्य यांचे नाव घेत राहुल गांधी म्हणाले की, त्यांनी मला सांगितले की, दलित असल्याने भाजपमध्ये त्यांचा छळ झाला. मात्र काँग्रेसने पक्षात चर्चेची दारे नेहमीच खुली ठेवली आहेत, त्यामुळे पक्षावर रोजच हल्ले होत आहेत.
राहुल गांधी म्हणाले की, आज देशाच्या राजकारणातही चर्चा किंवा संवाद शिल्लक राहिलेला नाही. काही दिवसांपूर्वी मी संसदेत म्हटले होते की, भारत हा राज्यांचा संघ आहे. जिथे राज्ये मिळून केंद्र बनवतात. म्हणूनच राज्ये आणि जनतेला संवाद साधण्याची संधी दिली पाहिजे. तुम्ही भारतातील लोकांमध्ये संवाद साधू शकता किंवा हिंसाचाराचा मार्ग निवडू शकता.
भाजप-आरएसएसच्या विचारसरणीशी लढा : राहुल गांधी
राहुल गांधी पुढे म्हणाले की, ''हे एक कुटुंब आहे आणि मी तुमच्या कुटुंबातील एक सदस्य आहे. माझा लढा देशासाठी धोकादायक असलेल्या आरएसएस आणि भाजपच्या विचारसरणीविरुद्ध आहे. हे लोक द्वेष पसरवणारे, हिंसाचार पसरवणारे आहेत... यांच्या विरोधात मी लढतोय आणि लढत राहणार. हा माझ्या आयुष्याचा लढा आहे. आपल्या या प्रिय देशात इतका हिंसाचार पसरू शकतो, हे मी मानायला तयार नाही. आमच्या विरोधात मोठ्या शक्ती आहेत, आजकाल भारतातील सर्व संस्था... असे समजू नका की, आम्ही एका पक्षाशी लढतो आहोत, आम्ही भारतातील प्रत्येक संस्थेशी लढत आहोत. आम्ही देशातील सर्वात मोठ्या भांडवलदारांविरुद्ध लढत आहोत. पण तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, कारण हा देश सत्यावर विश्वास ठेवतो, परिस्थिती काय आहे हे देशातील लोकांना माहित आहे.''
'काँग्रेस पक्षच देशाला पुढे नेऊ शकतो'
चिंतन शिबिरात राहुल गांधी म्हणाले की, ''विचार न करता लोकांमध्ये बसून त्यांची अडचण काय आहे, हे समजून घेतले पाहिजे. आपला जनतेशी जो संबंध होता, तो पुन्हा स्थापित करावा लागेल. काँग्रेस पक्षच देशाला पुढे नेऊ शकतो, हे जनतेला माहीत आहे. ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण कॉंग्रेस पक्ष जनतेत जाऊन थेट त्यांच्याशी संवाद साधणार आणि देशभरात यात्रा करणार. आपलं आणि जनतेचं नातं पुन्हा घट्ट होईल, मात्र यासाठी शॉर्टकट न वापरता जनतेत जाऊन घाम गाळून काम करावं लागेल.''