मुंबई: महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला अवघे तीन तास शिल्लक असताना एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार की नाही, यावरुन प्रचंड संभ्रमाचे वातावरण होते. गुरुवारी सकाळपासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आझाद मैदानावरील सोहळ्यात (Mahayuti Govenment oath Ceremony) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील की नाही, याबाबत उलटसुलट चर्चा सुरु होत्या. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेचे सर्व आमदार ठाण मांडून बसले होते. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद न स्वीकारता सरकारबाहेर राहून काम करण्याच्या मताचे होते. मात्र, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेच पाहिजे. ते शिवसेना आमदारांसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये सामील झाले पाहिजे, असा धोशा शिवसेनेच्या सर्व आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे लावला होता. तसेच एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील झाले नाही तर आम्हीदेखील मंत्रीपदं स्वीकारणार नाही, अशा पवित्र्यात शिवसेना आमदार होते. अखेर या हट्टापुढे एकनाथ शिंदे यांना नमते घ्यावे लागले असून त्यांनी आजच उपमुख्यमंत्रिपदाची शपध घेण्यास होकार दर्शविला आहे. थोड्याचवेळात एकनाथ शिंदे यांच्या नावाने राजभवनावर पक्ष पाठवले जाईल. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा आजचा उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी निश्चित मानला जात आहे.
या सगळ्या घडामोडी सुरु असताना भाजपचे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू गिरीश महाजन वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असे मला वाटत असल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे यांची कोणतीही नाराजी नाही. मी कोणताही संदेश घेऊन आलेलो नाही, असेही गिरीश महाजन यांनी म्हटले. मात्र, गिरीश महाजन हे अचानक वर्षा बंगल्यावर का आले, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महायुती सरकारचा शपथविधी दुपारी साडेपाच वाजता मुंबईतील आझाद मैदानावर संपन्न होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमस्थळी एकूण तीन स्टेज उभारण्यात आले आहेत. यापैकी एक स्टेज देशभरातून आलेल्या साधू आणि महतांसाठी राखून ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमाला केवळ पासेस असलेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
शिंदे गटाचे नेते सागर बंगल्यावर का गेले?
शिवसेनेचे एक शिष्टमंडळ काहीवेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचले आहे. या शिष्टमंडळात भरत गोगावले , उदय सामंत, रवी फाटक व संजय शिरसाट यांचा समावेश आहे. या शिष्टमंडळासोबत एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे पत्र आहे. हे पत्र आता राजभवनात नेऊन दिले जाईल.
आणखी वाचा