मुंबई : भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी साडे पाच वाजता मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा होईल. मिळालेल्या माहितीनुसार यावेळी फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीही शपथ घेतील. फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. आझाद मैदानावर जमा होणाऱ्या लोकांची संख्या लक्षात घेता या परिसरात एकूण 1500 पोलिसांची फौज तैनात करण्यात येणार आहे. दरम्यान, शपथविधीच्या या कार्यक्रमाल अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये खासदार शरद पवार यांचादेखील समावेश आहे. त्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना फोन केला आहे.
देवेंद्र फडणवीसांकडून शरद पवारांना फोन
मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी आज शरद पवार यांना फोन करून शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. मात्र सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू आहे. त्यामुळे शरद पवार यांना शपथविधीच्या कार्यक्रमला येता येणार नाही, असे सांगण्यात आले आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली होती. फडणवीस यांचा भाजपा हा पक्ष महायुतीमध्ये आहे तर शरद पवार यांचा पक्ष महाविकास आघाडीचा सदस्य आहे. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. हा विरोध निवडणुकीदरम्यान प्रखरतेने दिसला होता. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या पक्षांवर सडकून टीका केली होती. मात्र आता निवडणूक संपली आहे. त्यामुळे राजकीय वैर बाजूला ठेवून फडणवीस यांनी शरद पवार यांना फोन कॉल करून शपथविधीच्या कार्यक्रमाला निमंत्रित केले आहे. त्यांच्या या भूमिकेचे राजकीय वर्तुळातून स्वागत केले जात आहे.
उद्धव ठाकरे यांनाही आमंत्रण
राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनादेखील आजच्या शपथविधी कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांनादेखील या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत.
शपथविधी कार्यक्रमाची जोरदार तयारी
दरम्यान, आज संध्याकाळी साडे पाच वाजता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याच कार्यक्रमात अजित पवार हेदेखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत अस्पष्टता होती. मात्र आता शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची तयारी दाखवल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे तेदेखील याच कार्यक्रमात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे या शपथविधीच्या कार्यक्रमामुळे भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात उत्साह संचारला आहे. संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील येणार आहेत. त्यामुळे त्यांच्याही स्वागताचे बॅनर्स लागले आहेत. त्यामुळे आता शपथविधीच्या कार्यक्रमात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
Devendra Fadnavis Oath Ceremony LIVE Updates : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवार यांना फोन