Shrikant Shinde, Mumbai : महायुतीचा शपथविधी सोहळा आज (दि.5) मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीये. मुंबईत पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राज्यांचे प्रमुख उपस्थित होते. याशिवाय बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे या शपथविधी सोहळ्यादरम्यान दिसले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.
श्रीकांत शिंदे शपथविधी सोहळ्यात कोणाच्याही नजरेस पडले नाहीत, राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या
महायुतीच्या शपथविधी सोहळा पार पडला. मात्र, एकनाथ शिंदे यांची देहबोली गेल्या काही दिवसांप्रमाणेच होती. त्यात पुत्र श्रीकांत शिंदे शपथविधी सोहळ्यात कोणाच्याही नजरेस पडले नाहीत, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांनी जोर धरलाय. दरम्यान, संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने श्रीकांत शिंदे दिल्लीत असू शकतात, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही शपथविधीचे निमंत्रण दिले होते. मात्र, शरद पवार यांनीही संसदेच्या हिवाळी अधिवेशनामुळे उपस्थित राहता येणार नाही, असे सांगितले होते.
देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. याशिवाय अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे गेल्या अडीच वर्षांपासून मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिदेंनी आता उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. शिंदे गृहखात्यासाठी आग्रही असल्याचेही बोलले जात होते. दरम्यान, कालपर्यंत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायची की नाही? याबाबत एकनाथ शिंदे यांचा निर्णय झालेला नव्हता.
मुख्यमंत्रिपदाच्या शपथेनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या