मुंबई : ठाकरे गटाला मुंबईत कुणाची मतं पडली हे जगजाहीर आहे, त्यांच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे हिरवे झेंडे फडकत होते असा दावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला. वरळीतून (Worli Vidhansabha Election) यांना जेमतेम सहा हजारांचे लीड मिळालं आहे, त्यामुळे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना आता भेंडी बाजारसारखा मतदारसंघ शोधावा लागणार असल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. शिवसेनेच्या 58 व्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते.


एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, शिवसेनेचा मराठी मतदार आता त्यांच्यासोबत राहिलाय का ते पाहावं. मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा सव्वा दोन लाख मतदान आपल्याला जास्त पडलंय. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात त्यांच्या उमेदवाराला फक्त 6 हजारांचं लीड मिळालंय.


मतं मिळवण्यासाठी कुठून फतवे निघाले? 


उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "मतं मिळवण्यासाठी कुठून फतवे निघाले हे सांगायला नको. ओवैसीपेक्षा आता उद्धव ठाकरे हेच आपला मसिहा असल्याचं त्यांना वाटायला लागलंयय. हा मेळावा कुठे होतोय तर वरळीमध्ये. या वरळीमध्ये ठाकरे गटाला फक्त सहा हजारांचं लीड मिळालंय. काही म्हणत होते या ठिकाणी 50 हजारांचं लीड घेणार. कुठे गेले राजीनामे देणारे? इथून लढतो, तिथून लढतो, याला पाडतो, त्याला पाडतो असं म्हणणारे आता कसे जिंकणार? श्रीकांत शिंदे तर सोडा, पण नरेश मस्के नगरसेवक असताना म्हणत होता, माझ्यासमोर महापालिकेत येऊ दे, मी त्याला पाडतो. आता कसे जिंकणार? तुम्हाला भेंडी बाजारसारखा मतदारसंघ शोधावा लागेल."


लोकसभेच्या आणखी तीन-चार जागा जिंकल्या असत्या


लोकसभेच्या आणखी तीन चार जागा नक्की जिंकलो असतो, आपण का जागा हरलो ते आपल्या सर्वांना माहिती आहे, त्यात जाऊ इच्छित नाही असं सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केल. मी महायुतीचा मुख्यमंत्री आहे त्यामुळे माझ्यावर जास्त जबाबदारी आहे. महायुती आपल्याला ताकदीने पुढे न्यायाची आहे असंही ते म्हणाले.


काय म्हणाले एकनाथ शिंदे


ठाकरे गटाच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे हिरवे झेंडे फडकत होते. हिरव्या झेंड्यांनी भगव्या झेंड्यांवर वार केले. मतांसाठी किती लाचार होणार? लाज वाटत नाही का? हिंदू धर्माच्या पवित्र भगव्याची एवढी अहवेलना पाहिली होती का? याचं उट्ट विधानसभेत निघेल.


इक्बाल मुसासारखे बाँब स्फोटातील आरोपी यांच्यासोबत होते. मतांसाठी पाकिस्तानच्या कसाबला तुम्ही डोक्यावर घेतले. कसाबच्या गोळीने साळसकर, ओंबाळे, कामटे हे शहीद झाले का असा प्रश्न तुम्ही विचारला. शहीदांवर तुम्ही प्रश्नचिन्ह उभे केले? कुठे फेडणार हे पाप? 


औरंगजेबाचे गोडवे गाणऱ्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसतात. थोडी जनाची नाही तर मनाची तरी वाटते का नाही? बाळासाहेबांना काय वाटलं असेल याचा विचार केलाय का कधी? 


धनुष्यबाण पेलण्याची हिंमत मनगटात लागते, ते आपल्या शिवसेनेचे आहे. म्हणून धनुष्यबाणाला लोकांनी मतदान केले. एवढी कसली लाचारी. बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली. लोकसभेच्या आणखी तीन चार जागा नक्की जिंकलो असतो. आपण का जागा हरलो ते आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यात जाऊ इच्छित नाही. महायुती आपल्याला ताकदीने पुढे न्यायाची आहे. या महायुतीत मी मुख्यमंत्री आहे. म्हणून माझी जबाबदारी जास्त आहे. ही जबाबदारी मी पार पाडेन याचा विश्वास मी देतो. या वावटळीमध्ये शिवसेनेचा मुळ जो आधार आहे जो मतदार आहे तो दुसरीकडे गेला नाही. आपल्याकडे वळला, याचे उदाहरण शिवसेनेचे 19 टक्के मतदार होते, त्यापैकी 14.5 टक्के मतदार हे आमच्या शिवसेनेकडे आले आणि साडेचार टक्के मते तिकडे राहिली. मग इतर मते कशी आली, कुठून आली, उमेदवार कसे जिंकले हे महाराष्ट्राला माहिती. ही तात्पुरती आलेली सूज आहे, ती उतरते पण.


ही बातमी वाचा: