MNS Raj Thackeray: मुंबई : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या शपथविधीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना सन्मानपूर्वक आमंत्रण न दिल्यानं मनसे (MNS) कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. त्यानिमित्त राज ठाकरेंनी मुंबईत गुरुवारी सर्व पदाधिकाऱ्यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तीन नेत्यांनी राज ठाकरेंचं शिवाजी पार्क येथील निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर जाऊन भेट घेतली आहे. दोन तासांत शिंदेंचे तब्बल तीन नेते राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. 


शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील मंत्री तानाजी सावंत, ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के आणि शिवसेना मुंबई पदवीधर उमेदवार डॉ. दीपक सावंत शिंदेंच्या ताफ्यातील तीन नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. तिनही नेत्यांच्या बैठकीत नेमकं काय झालं, याबाबत मात्र, अद्याप काहीच माहिती समोर आलेली नाही. 


मागच्या दारानं नरेश म्हस्के राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर दाखल 


राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर नरेश म्हस्के यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. नरेश म्हस्के म्हणाले की, राज ठाकरे यांच्या नेतृत्वखालील राजकारणाची सुरूवात केली. त्यामुळें निवडून आल्यानंतर आज त्यांच्या भेटीसाठी आलो होतो. ठाणे निवडणूकीसाठी त्यांनी सभा घेतली होती. त्याचा फायदा झाला. विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. तसेच, काही लोकं विशिष्ट समाजाचे तुष्टीकरण करत आहेत. एकिकडे हिंदू म्हणतात आणि दुसरीकडं पाठीमागच्या दरवाजाने मदत घेत आहेत. जागा वाटप हे मीडिया समोर येऊन करायच नसतं. बैठक होईल त्यामधे त्यांनी भूमीका मांडायला हवी, असंदेखील नरेश म्हस्के म्हणाले आहेत. 


सोमवारी शिवसेना भवनात बैठका झाल्या. त्या ठिकाणी असणारे खासदार यांना धमक्या देण्यात आल्या आहेत. खासदारांवर अविश्वास दाखवण्यात आला आहे. आम्हाला सुपारी बाज म्हणता मग आमच्या मतांवर तुम्ही निवडून आलात, संजय राऊत तुम्ही खासदारकीचा राजीनामा द्या. जर आम्ही काम केलं नसतं, मतं दिली नसती तर आपण खासदार झाला नसता हे लक्षात ठेवा, असंदेखील नरेश म्हस्के म्हणाले आहेत. 


शिंदेंचे विधान परिषदेचे उमेदवारही राज ठाकरेंच्या भेटीसाठी 


शिवसेना मुंबई पदवीधर उमेदवार डॉ. दीपक सावंत यांनी राज ठाकरे यांच्याशी सदिच्छा भेट घेतली. महायुती तर्फे मुंबई पदवीधर साठी लढण्याचे फायनल झाले की, पाठिंबा देणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितलं. बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत पदवीधर निवडणुका संदर्भात अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. मुंबई पदवीधरसाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही राजकीय पक्षाचे उमेदवार आमने-सामने आहेत. आता महायुतीतर्फे निवडणूक कोण लढवणार याकडे प्रत्येकाचे लक्ष आहे. जर दीपक सावंत यांची उमेदवारी फायनल झाली तर राज ठाकरे त्यांना पाठिंबा देतील.