Jayant Patil NCP Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त अहमदनगर येथे विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी  शरद पवार यांच्या हस्ते नवनिर्वाचित खासदारांचा भव्य सन्मानसोहळा संपन्न झाला. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलीच, त्याशिवाय विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केल्याचं संकेतही दिले. "पोरं शाळा सोडून गेली तरी शाळा बंद पडत नसते, कारण आमच्या शाळेचे हेडमास्तर पवारसाहेब आहेत. त्याकाळी देखील माझ्यासारख्या अनेक नवीन कार्यकर्त्यांना त्यांनी संधी दिली. आज पुन्हा एकदा त्याच मोडमध्ये पवारसाहेब आहेत. भाजपा सारखे 400 पार म्हणण्याची मी चूक करणार नाही. पण विधानसभेत प्रत्येक सीट निवडून आणण्याची माझी जबाबदारी आहे. समोरच्याला अंदाज येऊ न देता आपल्याला विजय मिळवायचा आहे, असे जयंत पाटील म्हणाले. 


सुप्रिया ताईंचा पराभव व्हावा यासाठी सर्व शक्ती एकवटली होती -


पक्षाने खूप मोठा पल्ला गाठला आहे. आपण अनेक संकटं पाहिली. पवार साहेबांनी पुढे राहून त्यांना तोंड दिले. सत्ता आली, गेली. मात्र डोळ्यात पाणी आणून पवार साहेबांवर, त्यांच्या विचारांवर प्रेम करणारे कार्यकर्ते राज्याच्या कानाकोपऱ्यात आहेत. त्यामुळेच कमी जागा मिळून सुद्धा 8 जागा जिंकण्याची किमया आपल्या पक्षाने केली. पवार साहेबांना बारामतीतच अडकवून ठेवण्याची काही जणांची खेळी होती. सुप्रिया ताईंचा पराभव व्हावा यासाठी सर्व शक्ती एकवटली होती. मात्र बारामतीत न अडकता पवार साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला. पूर्वी दिवसाला पंधरा सभा पवार साहेब घ्यायचे. आपल्या मतदारसंघात पवार साहेबांची सभा झाली की, आपण निवडणूक जिंकलो ही प्रत्येक आमदाराची खात्री होती, असे जयंत पाटील म्हणाले.  






मोदी सरकार पाच वर्ष टिकेल याची शाश्वती नाही -


पक्ष हा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांची संपत्ती आहे, कोणा एकाची नाही. पुढील चार महिने आपण एकदिलाने राहू. त्यामुळे जाहीर वक्तव्यं करणे बंद करा. टीम वर्क ज्यावेळी होते, तेव्हाच विजय मिळतो, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. "नितेशकुमार आणि चंद्रबाबू नायडू यांचा इतिहास पाहता हे सरकार पाच वर्ष टिकेल याची शाश्वती नाही. नरेंद्र मोदींना संपूर्ण देशातून नापसंती मिळाली आहे. राज्यातील नेतृत्वाला देखील नापसंती आहे, हे ध्यानात ठेवा. आता विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील प्रश्नांवर आपल्याला लक्ष केंद्रित करायचे आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले."


आणखी वाचा :


शरद पवार भाकरी फिरवणार, जयंत पाटील नोव्हेंबरनंतर अध्यक्षपद सोडणार, राष्ट्रवादीचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण?