Eknath Shinde, सातारा : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 105° ताप आलाय. कणकणी आल्याने शिंदे दिवसभरापासून घराबाहेर पडलेले नाहीत. दरम्यान, डॉक्टरांची टीम मुख्यमंत्र्यांना तपासण्यासाठी आली आहे. मुख्यमंत्र्यांना डॉक्टरांनी सध्या सलाईन लावण्याचा सल्ला दिला आहे..त्यांच्या घरातच त्यांना सलाईन लावलं जाणार आहे.
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या साताऱ्यातील मूळ गावी आले आहेत. सत्ता स्थापनेच्या धावपळीतच ते गावी आल्याने अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता गावी आल्यानंतर शिंदेंची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या दरे येथील बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल झाली आहे. त्यांच्या शरीराचे तापमान हे 105° असून नुकतेच त्यांना सलाईन लावल्याचे सूत्रांकडून समजत आहे. प्रकृतीच्या कारणास्तव शिंदे आज बाहेर पडले नाहीत. त्यांनी घरीच आराम करणे पसंत केले. ऐन राजकीय घडामोडींच्या काळातच शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता मुख्यमंत्रीपदाचा मान कोणाला मिळणार यावरून स्पर्धा सुरू आहे. मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. ऐन शपथविधी सोहळ्याची वेळ जवळ येते तेच नाराज एकनाथ शिंदेंनी थेट गाव गाठलं आहे. ऐन अमावस्येला एकनाथ शिंदे गावी गेल्याने चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान एकनाथ शिंदे नाराज होऊन आपल्या गावाला निघून गेले; त्यांच्या गावात अशी कोणती देवी आहे? असे म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.
दीपक केसरकर माघारी गेले..
शिंदे गटाचे नेते माजी मंत्री दीपक केसरकर हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला त्यांच्या दरे या गावी आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्याने केसरकर यांना बंगल्याच्या गेटवरूनच माघारी परतावे लागले. दरम्यान केसरकर मुंबईला रवाना झाले.
महायुतीत मुख्यमंत्रिपदावरुन खल सुरु
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालंय. 288 पैकी 236 जागांवर महायुतीने विजय मिळवलाय. महायुतीने या निवडणुकीत निर्विवाद यश मिळवत महाविकास आघाडीचा सुपडासाफ केलाय. दरम्यान, महायुतीने विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली होती. मात्र, आता मुख्यमंत्रिपद भाजपच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरु केले आहे.
अमित शाहांसोबत एकनाथ शिंदेंच्या बैठका
महायुतीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार ? याबाबत महायुतीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून खल सुरु आहे. दरम्यान, गुरुवारी महायुतीची दिल्लीत एक बैठक पार पडली होती. या बैठकीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या बैठकीतील फोटोंमध्ये एकनाथ शिंदे यांचा चेहरा पडलेला पाहायला मिळाला. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या चेहऱ्यावर हास्य असलेलं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा देखील सुरु झाली होती.
अमित शाह महाराष्ट्रातील नेत्यांशी संवाद साधणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रातील नेत्यांशी संवाद साधणार आहेत. भाजप आमदारांची बैठक 2 किंवा 3 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदारांशी व्हीसीद्वारे साधला संवाद साधलाय. 5 डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधीला उपस्थित राहण्याच्या आमदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासोबतच महायुती सरकारचा शपथविधी होत असताना आपापल्या जिल्ह्यांमध्ये जल्लोष करण्याचे देखील बावनकुळे यांनी सांगितल्याची माहिती समोर आलीये. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव पासेस देण्यात आलेल्या व्यक्तींनाच आझाद मैदानात प्रवेश दिला जाईल असेही ठरल्याचं कळतंय.
इतर महत्त्वाच्या बातम्या