छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीत (Mahayuti) सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. एकीकडे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या सोबत झालेल्या बैठकीत 12 मंत्रिपदाची मागणी केली आहे. मात्र शिंदे गटाच्या चार नेत्यांच्या मंत्रिमंडळात समावेशाला भाजपने आक्षेप घेतल्याची माहिती समोर आली. यात अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या नावाचा देखील समावेश असताना आता त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कारण अब्दुल सत्तार यांच्याविरोधात सिल्लोड न्यायालयात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे. निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी ही याची दाखल करण्यात आली आहे.
सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि पुणे येथील डॉ. अभिषेक हरिदास यांनी अब्दुल सत्तार यांच्या नामनिर्देशन पत्र सोबत सादर केलेल्या शपथबद्ध शपथपत्रावर मतदानापूर्वीच लेखी आक्षेप सादर केला होता. परंतु या आक्षेपावर निवडणूक आयोगाने अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे शपथपत्रात खोटी, भ्रामक आणि दिशाभूल माहिती देणे हा लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 कलम 125 अ नुसार गुन्हा आहे. तक्रारीबाबत आयोगाने कोणतीच कारवाई न केल्यामुळे या प्रकरणात सिल्लोड दिवाणी तथा फौजदारी न्यायालयात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे.
याचिकेत गंभीर आरोप
अब्दुल सत्तार हे सातत्याने प्रत्येक निवडणुकीत खोटी माहिती देऊन निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे मतदारांची फसवणूक होऊन मानव अधिकार हक्काचा भंग होत आहे, असा गंभीर आरोप याचिकेत करण्यात आला आहे. याचिकेत अब्दुल सत्तार अब्दुल नबी व निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ इब्राहिम पठाण यांना प्रतिवादी बनविण्यात आले आहे. यामुळे अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढल्याचे दिसून येत आहे.
उमेदवारी रद्द करण्याची मागणी
दरम्यान, काही दिवसांपूर्वी महेश शंकरपेल्ली यांनी अब्दुल सत्तार यांच्या निवडणूक शपथपत्रात 16 चुका असल्याचे सांगताना त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. यात त्यांनी सत्तारांनी शपथपत्रात दाखवलेल्या मालमत्तेचा तपशील आणि प्रत्यक्ष मालमत्ता यामध्ये प्रचंड तफावत आहे. अनेक मालमत्तांचे क्षेत्रफळ हे चुकीचे दाखवण्यात आले आहे. काही मालमत्तेची माहिती शपथ पत्रातून गायब करण्यात आली आहे. विविध सहकारी संस्थांमध्ये सत्तार त्यांच्याकडे असलेल्या शेअर्सबाबतही खोटी माहिती देण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला होता.
आणखी वाचा