Eknath Shinde : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद महायुतीत (Mahayuti) अजूनही कायम आहे. त्यातच आज मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात रायगड जिल्ह्याची डीपीडीसी (Raigad DPDC) बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी हजेरी लावली होती. मात्र, या बैठकीला रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) गैरहजर होते. तर शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी आम्हाला या बैठकीचे निमंत्रणच देण्यात आले नव्हते, असा दावा करत संताप व्यक्त केला. आता यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी डीपीडीसी बैठकीचं निमंत्रण न मिळाल्याने संताप व्यक्त करताच अजित पवारांच्या कार्यालयाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले. नाशिक आणि रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नाहीत म्हणून आम्ही केवळ मंत्र्यांना बैठकीसाठी बोलावले. रायगडचे मंत्री म्हणून अदिती तटकरे आणि भरत गोगावले यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र भरत गोगावले बैठकीसाठी आले नाहीत.  नाशिकच्या वार्षिक जिल्हा नियोजन बैठकीसाठी दुपारी मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांना निमंत्रण देण्यात आले आहे, अशी माहिती अजित पवार यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. 


काय म्हणाले एकनाथ शिंदे? 


याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले की, ठीक आहे. आमदारांनी त्यांच्या भागातील ज्या काही सूचना असतील, त्या त्यांनी द्यावात. त्या मी, देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा हे अर्थसंकल्पात घेऊ, असे त्यांनी म्हटले. तर आज रायगडच्या जिल्हा नियोजनासंदर्भात बैठक झाली. पालकमंत्र्याचा वाद देखील लवकर मिटेल, असे देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.  



मुंबई आणि ठाणे जिल्ह्यासाठी निधीची मागणी 


दरम्यान, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मुंबईच्या वार्षिक जिल्हा नियोजणासाठी बैठकीसाठी पार पडली. याबाबत विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले की, अनेक विषयांवर चर्चा झाली. मुंबई शहर ही आपली आर्थिक राजधानी. तिथे जगभरातून लोक येतात. मुंबईची जिल्हा नियोजनाची मी याआधी बैठक घेतली तेव्हा आमदारांनी काही सूचना केल्या होत्या. त्या सूचनाप्रमाणे मुंबईतले हॉस्पिटल, उद्यान, रस्ते त्याचबरोबर नवीन प्रकल्प संदर्भात चर्चा करण्यात आली होती. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यासाठी आवश्यक तो निधी ठेवण्याची मागणी मी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच ठाणे जिल्हा देखील मोठा जिल्हा आहे. ठाणे जिल्ह्यासाठी देखील निधीची मागणी केल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.  


आणखी वाचा 


Raigad DPDC: शिंदे गटाच्या आमदारांना गाफील ठेवून रायगड डीपीडीसीची बैठक, अजितदादांसोबत अदिती तटकरेंची हजेरी, नेमकं काय घडलं?