पुणे: राज्यातील नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यावरून महायुतीत धुसफूस असल्याची चर्चा होती. अशातच शिवसेनेच्या आमदारांशिवाय रायगड जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ऑनलाईन पध्दतीने या बैठकीला उपस्थित होते, भरत गोगावले रायगडमध्ये आहेत, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी हे शिंदे यांचे आमदार देखील रायगडमध्ये असल्याची माहिती आहे. यामुळे एकनाथ शिंदेंच्या आमदारांच्या शिवाय रायगड जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक पार पडली यामुळे राजकीय वर्तुळात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नाराजीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्याचबरोबर या बैठकीबाबत माहिती नसल्याचं आमदार महेंद्र दळवी यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात ही रायगड जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी अदिती तटकरे यांनी हजेरी लावली होती. तर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. तर या बैठकीला शिवसेनेचे आमदार गैरहजर होते. तिनही आमदार गैरहजर असल्याने पालकमंत्री पदावरून पुन्हा तिढा निर्माण झाला आहे का अशी चर्चा आहे. वार्षिक जिल्हा नियोजन बैठकीसाठी एकनाथ शिंदे उपस्थित होते.
आधी आम्हाला निमंत्रण दिलं पाहिजे
या बैठकीबाबत शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला असता त्यांनी या बैठकीबाबत माहिती नसल्याचं बोलताना सांगितलं. अजित दादांच्या दालनामध्ये बैठकीसाठी आदिती तटकरे उपस्थित होत्या. अधिकारी ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते, अजित दादांच्या उपस्थितीमध्ये ही आढावा बैठक पार पडल्याचे आम्हाला माहिती आहे, मीटिंग ठरलेली असेल तर त्यांनी आधी आम्हाला निमंत्रण दिलं पाहिजे, तसं काहीच झालं नाही. जिल्ह्याची आढावा बैठक असेल तर आम्हाला तिथं बोलवलं पाहिजे. आम्हाला या बैठकीबद्दल काही माहिती नव्हती. आम्हाला पालकमंत्री पदापासून मी दूर ठेवलेला आहे, असे निर्णय घेणे योग्य नाही असे आमचे मत आहे, असंही महेंद्र दळवी पुढे बोलताना म्हणालेत.
पालकमंत्री पदाबाबत बोलताना महेंद्र दळवी म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आमचा याबाबत सखोल बोलणं झाला आहे. पालकमंत्रीपदासाठी आमची आग्रही मागणी आहे, आम्हाला पालकमंत्री पद मिळालं पाहिजे. सर्व नेत्यांची इच्छा आहे. त्याचबरोबर प्रोटोकॉल नुसार पालकमंत्री पद आम्हाला मिळालं पाहिजे. येत्या दोन दिवसांमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेते आणि निश्चित न्याय देतील असं मला वाटतं. आम्ही आजच्या झालेल्या बैठकीबाबत एकनाथ शिंदे यांचे चर्चा करू. या बैठकीचा विषय आम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहोत, आम्हाला का बोलावलं गेलं नाही याबाबत आम्ही चर्चा करू असंही महेंद्र दळवी यांनी म्हटलं आहे.
वार्षिक जिल्हा नियोजन बैठक म्हणजे ?
पालकंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक घेतली जाते. जिल्ह्याचं वर्ष भराचं नियोजन करण्यासाठीची ही बैठक असते. आदिती तटकरे बैठकीसाठी उपस्थित होत्या, तर रायगड जिल्हाधिकारी ऑनलाईन उपस्थित होते, शिंदे आमदार ऑनलाईन उपस्थित राहणं अपेक्षित होतं, मात्र ते नव्हते, त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत जुंपली आहे. दोन्ही पक्ष पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहेत. राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचं पालकमंत्रीपद दिलं गेलं होतं. यामुळे जिल्ह्यात नाराजी दिसून आली. शिवसेना कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलने केली. शिवसेनेचे जिल्ह्यातील तिनही आमदार तटकरे यांच्या विरोधात आक्रमक झाले. इतरही आमदारांंनी नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. या वादानंतर आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदी झालेल्या नियुक्तीला तातडीने स्थगिती देण्यात आली. महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते एकत्र बसून हा वाद सोडवतील असं सांगण्यात आलं. मात्र अद्याप पर्यंत या वादावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे रायगड जिल्ह्याला पालकमंत्री मिळू शकलेला नाही. अशातच ही बैठक पार पडल्याने पुन्हा आणखी वाद वाढण्याची शक्यता आहे.