मुंबई : राज्य सरकार महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणत असेल तर आम्हाला त्याचा आनंद आहे. पण, लेकींची काळजी करताना लेकाची काळजीही करावी. त्यासाठी सरकारने 'लाडका भाऊ' किंवा 'लाडका पुत्र' अशी योजनादेखील सुरू करावी, अशी मागणीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. ते शुक्रवारी राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तर, अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्प (Budget) सादर केल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली असून लोकसभेला जो दणका दिला, त्यानंतर हे बजेट समोर ठेवल्याचं ठाकरेंनी म्हटलं. तसेच, देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadanvis) नेरेटीव्हवरुन होणाऱ्या टीकेलाही त्यांनी बजेट प्रतिक्रियेतून उत्तर दिलंय.


जनतेनं लोकसभेला जो दणका दिला त्यानंतर राज्य सरकारने हे बजेट समोर ठेवलं आहे, पण जनता यांच्या भुलथापाला बळी पडणार नाही. काहीतरी धुळफेक करायची, जनतेला लुबाडायचं काम हे सरकार करत आहे. थापांचा महापूर, आश्वासनाची अतिवृष्टी म्हणजे आजचा अर्थसंकल्प आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेत बोलायचं झालं तर खोटं नेरेटिव्ह पसरव्याचं काम या बजेटमधून केलं आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पावर टोला लगावला. 


माता भगिनी ला जे देताय ते जरूर द्या, महिलांच्या मताकडे पाहून हे केलय.पण, राज्यातील पण बेरोजगार तरुणांचा काय? त्यासाठी काय करणार, असा सवालही ठाकरेंनी विचारला. शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्याची मागणी त्यांनी मान्य केली, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा काय. बी बियाणे अवजारे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेत. यावर जिएसटी लावला आहे, तो आता कमी करुन 5 टक्के केला आहे. शेतकऱ्याला एकबाजूने लुटायचं आणि दुसरीकडे मदत दिली म्हणून दाखवायचं. लबाडाघरचं हे अवतान आहे. हा अर्थसंकल्प आहे की जुमलासंकल्प आहे, असे म्हणत शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनही उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला.  


लाडका पुत्र योजना आणावी


महाराष्ट्र लुटणाऱ्याला जनता कधी माफ करणार नाही. सरकारने लाडकी बहीण योजना आणली, आम्हाला आनंद आहे. परंतु, महिलांसाठी योजना आणल्यानंतरही आजसुद्धा लोंढेच्या लोंढे नोकरीच्या शोधत फिरत आहेत. लेकींची काळजी घेत आहेत, लेकांची काळजी यात नाही, त्यामुळे, लाडका पुत्र हीदेखील योजना त्यांनी आणावी. अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली आहे.   


आर्थिक तरतूद कुठून आणणार


महाराष्ट्रातील जनता यांना पुन्हा निवणून आणणार नाही, वारकऱ्यांना पैशांचे काही देणेघेणे नसते. वारकऱ्यांना तुम्ही पैशाचं लोभ दाखवू शकत नाही, त्यांना पण विकत घेण्याचा हा प्रयत्न आहे का, असा सवाल दिंडीसाठी देण्यात आलेल्या 20 हजार रुपयांवरुन ठाकरेंनी विचारला आहे. तसेच, मौलाना की कसली तरतूद त्यांनी वाढवली म्हणजे या सरकारने हिंदुत्व सोडले का ? हा गाजराचा अर्थसंकल्प आहे, आर्थिक तरतूद कुठून आणणार? महाराष्ट्र स्वाभिमानी आहे, कर्तबगार तरुण तरुणी महाराष्ट्रात आहेत, असे म्हणत अर्थसंकल्पाच्या घोषणांच्या अंमलबजावणीवरुन ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केले आहेत. 


हेही वाचा 


अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार