Eknath Shinde: बदलापूरमध्ये शिंदे गटाचे शहराध्यक्ष वामन म्हात्रे (Waman Mhatre) यांच्या कुटुंबातील तब्बल सहा जणांना एकाचवेळी उमेदवारी मिळाल्यानंतर घराणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर आलाय. या मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गटावर (Shiv Sena Shinde Faction) विरोधकांनी जोरदार टीकास्त्र डागले आहे. आता, कल्याण-डोंबिवलीसह अन्यत्र त्याची पुनरावृत्ती नको, याची काळजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आणि भाजपने मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. आता एकाच घरात केवळ दोघांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे स्वतः, पत्नी, मुलगा, सून, जावई अशा गोतावळ्याला उमेदवारीची खिरापत मिळेल याकरिता एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारलेल्या आणि आता उड्या मारण्याच्या बेतात असणाऱ्यांची चांगलीच अडचण होणार आहे.

Continues below advertisement

बदलापूरमध्ये वामन म्हात्रे, त्यांची पत्नी, भाऊ तुकाराम म्हात्रे, भावजय उषा म्हात्रे, मुलगा वरुण आणि पुतण्या भावेश अशा सहा नातेवाईकांना तिकीट देण्यात आले. 2015 मध्येही त्यांच्या घरातील चार जणांना उमेदवारी मिळाली होती. यामुळे या वर्षी मिळालेल्या सहा तिकिटांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले. अनेकांनी उघडपणे घराणेशाहीचा आरोप करत शिंदेसेनेवर टीकास्त्र सोडले. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे एका प्रभागातून तीन ते चार उमेदवार निवडून येतात. त्यामुळे स्थानिक बड्या नेत्यांना आपल्या घरातील जास्तीत जास्त जणांना उमेदवारी मिळवून पूर्ण प्रभागावर ताबा ठेवण्याची संधी मिळते. या मार्गाने निवडणुकीतील खर्च, प्रभागातील भविष्यातील नागरी कामे, कंत्राटांचे वाटप आणि टक्केवारीवर नियंत्रण असे फायदे मिळतात. परिणामी प्रभाग अक्षरशः एका घराच्या खिशात जातो, अशी तक्रार अनेक वर्षांपासून केली जात असली तरी वामन म्हात्रे प्रकरणाने हा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

Kalyan Dombivali: कल्याण आणि डोंबिवलीमध्ये घराणेशाहीचे सावट गडद

या पार्श्वभूमीवर डोंबिवली आणि कल्याणमध्येही घराणेशाहीचे सावट गडद होताना दिसत होते. भाजपमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे आणि जयेश म्हात्रे यांना स्वतःसह कुटुंबातील आणखी एक जणाला उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा असल्याची माहिती समोर येत आहे. तर माजी नगरसेवक राजन मराठे हे दोन जणांना संधी मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच भाजपचे विश्वदीप पवार यांनी स्वतः आणि पत्नी अशा दोघांची उमेदवारी मिळण्यासाठी जोर धरल्याचे समजते. मात्र, वामन म्हात्रे प्रकरणानंतर या सर्वांचे राजकीय गणित गुंतागुंतीचे झाले असून, पक्षांतर करून तिकीट मिळवू पाहणाऱ्यांनाही आता मर्यादांचा धक्का बसणार आहे.  त्यामुळे स्वतः, पत्नी, मुलगा, सून, जावई अशा गोतावळ्याला उमेदवारीसाठी पक्ष बदलणाऱ्या नेत्यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसून येते.  

Continues below advertisement

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Eknath Shinde and Balasaheb Thorat: एकनाथ शिंदेंचा स्टेजवरुन मंत्र्यांना फोन लावून ऑन द स्पॉट फैसला करण्याचा सपाटा, बाळासाहेब थोरातांनी उडवली खिल्ली, म्हणाले...