Solapur News करमाळा: सध्या इथे येऊन कोण म्हणतं तिजोरी आमच्याकडे आहे, तर कोण म्हणतं चावी आमच्याकडे आहे. पण बँकच आमच्याकडे आहे. मग तिजोरी आणि चावी कुठून आणणार अशी फटकेबाजी करीत सोलापुरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी महायुती मधील मित्र पक्षांच्या नेत्यांनाच लक्ष्य केलंय. करमाळ्यात (Karmala) आयोजित प्रचार सभेत बोलताना त्यांनी तुफानी फटकेबाजी केलीय.
Jayakumar Gore : एकदा भाजपकडे सत्ता देऊन बघा, नाहीतर..
मुख्यमंत्री म्हणजे सरकार असते. मंत्रिमंडळ ही व्यवस्था असते असे सांगत राज्यातील प्रत्येक प्रोजेक्ट हा मुख्यमंत्र्याच्या सहीने मंजूर होत असतो. कदाचित हे लोक विसरलीत, असा टोलाही जयकुमार गोरेंनी मित्रपक्षांना लगावलाय. आजवर करमाळ्यात यांनी कायमचे ठरवले होते. तुम्ही नाही तर आम्ही. पण मध्येच भाजप आल्याने त्यांचे वांदे झाले. एकदा भाजपकडे सत्ता देऊन बघा. नाहीतर आत्तापर्यंत तर काय विकास झालाय हे तुम्हाला माहितीच आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
Jayakumar Gore : दोघे मिळून वाटून खाऊ, करमाळ्याची वाट लावू
दरम्यान, या दोघांचे ठरलेले असावे. कधी यांची सत्ता तर कधी त्यांची, असे दोघात वाटून घेणे सुरू आहे. याचा नगराध्यक्ष असला की तो ठेकेदार होतो आणि त्याचा नगराध्यक्ष असला की हा ठेकेदार होतो. एकंदरीत काय दोघे मिळून वाटून खाऊ आणि करमाळ्याची वाट लावू अशा शब्दात मित्र पक्षातील नगरपालिका सत्ताधाऱ्यांनाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी टोले लगावले. भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात करमाळा नगरपालिका दिल्यास मी पालकमंत्री म्हणून दत्तक घेतो, असे म्हणत गोरे यांनी ग्रामदैवत कमलाभवानी देवीची शपथ घेतली. यावेळी गोरे यांनी सुनीता देवी यांना नगराध्यक्ष बनविण्याचेही आवाहन केले.
Jayakumar Gore : कोणाचेही पैसे घ्या मात्र मत देतांना देवा भाऊचे पंधराशे रुपये लक्षात ठेवा
2 तारखेला मतदान आहे, पैसा कुणाचे पण घ्या, काही फरक पडत नाही. सगळ्याचे पैसै घ्या, पण मत देताना देवा भाऊचे पंधराशे रुपये लक्षात ठेवा. असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कुर्डूवाडी येथील सभेत केले. एकाबाजूला नगरपालिका निवडणुकीत पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे आरोप शरद पवार आणि उद्धव ठाकरे करीत असताना सत्तेतील मंत्री असणाऱ्या गोरे यांनीही या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला. या बंगल्यात एवढा माल आलाय. या मोहल्यात एवढा माल आलाय. सगळ्यांचे पैसे घ्या. हे काही पैसे यांच्या बापाचे नाही. तुमचेच पैसे आहेत. तुमच्याच कामातून कमिशन खाल्ले आहे. 166 कोटी रुपयांच्या कामाचे कमिशन आहे. सगळ्यांचे पैसे घ्या, पण मत देताना तुम्हाला स्वाभिमानी बनविणाऱ्या तुमचा सन्मान करणाऱ्या भाजपच मत देण्याचे आवाहन जयकुमार गोरे यांनी लाडक्या बहिणींना केले.
इतर महत्वाच्या बातम्या