अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वांच लक्ष लागलेल्या संगमनेर नगरपालिका निवडणुकीची रंगत वाढू लागली आहे. भाजपा शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काल (शुक्रवारी, ता २८) राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संगमनेर शहरात सभा घेतली आणि या सभेत दोन मंत्र्यांना फोन लावत कामे मंजूर करण्याचे आदेश दिले. तर भाजपाचे युवा नेते सुजय विखे यांनी देखील बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबेवर टीका करत टायगर अभी जिंदा है ची घोषणा दिली. या सभेनंतर संगमनेर शहरात आज थोरात तांबे यांच्या नेतृत्वातील संगमनेर सेवा समितीने सभा घेत एकनाथ शिंदेंच्या सभेला प्रत्युत्तर दिलं आहे. सुजय विखे यांनी केलेल्या टायगर व सिंहाच्या टिकेला उत्तर देताना सत्यजित तांबे यांनी टोला लगावला तर एकनाथ शिंदे यांनी दोन मंत्र्यांना फोन लावून मंजूर केलेल्या कामांवरून एकनाथ शिंदेंवर बाळासाहेब थोरात यांनी फोन कॉल ऐकवत निशाणा साधला. त्यामुळे संगमनेर नगरपालिका निवडणुकीत रंगत वाढली असून मतदार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
Balasaheb Thorat: जिथे जाईल तिथे मंत्र्यांना फोन लावून हे मंजूर ते मंजूर करतायेत
एकनाथ शिंदे यांनी संगमनेर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असताना सभेवेळी त्यांच्या विशेष 'फोन ऑर्डरची' काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मिश्किल शैलीत खिल्ली उडवली. संगमनेरमधील एमआयडीसीचा प्रश्न आणि रुग्णालयाच्या दुरावस्थेवरून त्यांनी संबंधित दोन्ही खात्यांच्या मंत्र्यांना फोन लावून तत्काळ आदेश दिले. हाच धागा पकडून बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ शिंदे यांना कोपरखळी मारली आहे. जिथे जाईल तिथे मंत्र्यांना फोन लावून हे मंजूर ते मंजूर करतायेत, निवडणुकीत असे स्टंट करायला लागतात पण त्यालाही काही मर्यादा असते, असे थोरात म्हणालेत.
Balasaheb Thorat: खासदारकी, आमदारकी, मंत्रीपद असताना तुम्हाला एक रस्ता होत नाही
पुढे बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, काल जे आले त्याला सत्यजित तांबेंनी उत्तर दिलं. मोठ्यांना उत्तर द्यायची जबाबदारी माझी. संगमनेरला ते आले होते, विकासासाठी मतदान करा म्हणत होते. त्यांनी आधी नगर मनमाड महामार्ग करावा आणि नंतर आम्हाला सांगावं. खासदारकी, आमदारकी, मंत्रीपद असताना तुम्हाला एक रस्ता होत नाही. एवढं करा आणि मग संगमनेर वाल्यांना विकासाच्या गप्पा करायला या, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Balasaheb Thorat: हे जिथे जातील तिथं एमआयडीसी मंजूर करतात
निवडणुकीत थोडी बनवाबनवी करावी लागते. तुम्हाला निवडणूक काळात फंडे करायची सवय आहे. पण संगमनेरची जनता हुशार आहे. शिंदे संगमनेरमध्ये आले होते, त्यावेळी शहरासाठी जे जे काही लागेल ते सगळे मंजूर होते. त्यांच्या भाषणातून हे मंजूर ते मंजूर असे त्यांनी सांगितले. हे जिथे जातील तिथं एमआयडीसी मंजूर करतात. लोक म्हटले थोडं पाणी पाहिजे शिंदे म्हणतात धरण मंजूर, लोक म्हणतात धरणाला नदी नाही नदी मंजूर. नदीला पाणी नाही डोंगर मंजूर, निवडणुकीत बनवाबनवी करायची तुम्हाला सवय लागली आहे. अशी ही बनवाबनवी चा कार्यक्रम करू नका, असंही पुढे बाळासाहेब थोरातांनी म्हटलं आहे.