पुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेत आलेला आणि विरोध झालेला एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजप पक्षप्रवेशाबाबतचे काही खुलासे आज केले आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ खडसे महणाले, भाजपच्या नेत्यांची दिल्लीत भेट झाली. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेशाची प्रक्रिया झाली. गळ्यात मफलर देऊन पक्षात प्रवेश झाला असं देखील म्हटलं पण, त्यानंतर राज्यातील नेत्यांनी माझा विरोध केला अशी माहिती खुद्द एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिली आहे.


काय म्हणाले एकनाथ खडसे?


एका वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, मी स्वत:हून भाजपमध्ये प्रवेशासाठी विनंती केलेली नव्हती. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मला भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी सांगितलं होतं. त्यावेळी मी त्यांना वेळ मागितला मात्र ते म्हणाले वेळ कशाला पक्षप्रवेश करून घ्या. त्यावेळी विनोज तावडे, रक्षा खडसे यांच्यासोबत मी भाजपच्या नेत्यांची दिल्लीत भेट घेतली. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी माझ्या गळ्यात मफलर घालून तुमचा प्रवेश झाला असं सांगितलं. परंतु राज्यातील काही नेत्यांकडून माझ्या प्रवेशाला विरोध झाला. त्यामुळे माझा पक्षप्रवेश थांबला. मुळात माझी फारशी इच्छा नव्हती.पण, भाजपच्या जेष्ठ्य नेत्यांकडून मला सूचना आल्या म्हणून मी प्रवेश केला, असं एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) म्हटलं आहे. 


'लोकसभेची निवडणूक होती. त्यात भाजपाचे ९ खासदार निवडून आले. तेव्हा भाजपाची स्थिती नाजूक आहे, असं अनेकदा सर्वेमध्ये, बातम्यांमध्ये दिसत होतं. भाजपाला बळकटी मिळावी या हेतूने वरीष्ठांनी मला भाजपा प्रवेशाची विनंती केली असावी किंवा तसा प्रयत्न केला असावा. रक्षा खडसे निवडणुकीत उभ्या राहिल्या तेव्हा त्यांना मदत करण्याचं भाजपातून आवाहन करण्यात आलं. मी त्यांना मदत केली, त्या निवडून आल्या. तोपर्यंत मी चांगला होतो. पण मग लोकसभा निवडणुकीत उमेदवार निवडून आल्यानंतर मात्र प्रवेशाला विरोध झाला, आम्ही यांचा प्रवेश होऊ देणार नाही, आमचा याला विरोध झाला', असंही यावेळी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी म्हटलं आहे.


ज्या माणसाने ४० वर्ष भारतीय जनता पार्टी उभी केली.हे आज बोलत आहेत ते माझ्या नेतृत्त्वाखाली काम करत होते. यांच्या जीवनात मी त्यांना राजकीय बळ दिलं आहे. पंरतु आता ते काही कारणांनी विरोध करायला लागले. पण ठिक आहे, मी देखील भाजपमध्ये जाण्यासाठी फार उत्सुक नव्हतो. भाजप नेत्यांनी मला सूचना दिल्या म्हणून मी पक्षप्रवेशाची तयारी दाखवली. त्याआधी मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली आहे.