Eknath Khadse On Shiv Sena Dasara Melava 2022: वर्षानुवर्षे बाळासाहेब ठाकरेंच्या उपस्थितीत शिवाजी पार्क शिवसेनेचा दसरा मेळावा हा पार पडत आला आहे. त्यामुळे दसरा मेळावा साजरा करण्याचा पहिला अधिकार हा उद्धव ठाकरे यांनाच आहे. त्यामुळे त्यांना परवानगी दिली पाहिजे. महापालिकेने यासंदर्भात धोरण निश्चित करून परवानगी द्यावी आणि त्यांना परवानगीच मिळेल अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक आघाडी तसेच ग्रंथालय सेल तर्फे शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला एकनाथ खडसे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते असं म्हणाले आहेत.


'मंत्र्यांच्या मुलांचा सहभाग अन् याच सरकारकडून टीईटी घोटाळ्याची चौकशी'


टीईटी घोटाळ्यावरूनही एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. या घोटाळ्यामध्ये सरकारमधील मंत्र्यांच्या मुलांचा सहभाग असताना दाद कुणाकडे मला गावी, असा प्रश्न असून त्यांच्याकडून या घोटाळ्याची चौकशी होते. हे दुर्दैवी असल्याचे मत खडसे यांनी व्यक्त केलं आहे.


'उपप्रादेशिक परिवहन विभाग म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी, त्यामुळे तक्रारी करूनही कारवाई होत नाही'


जिल्ह्यात उप प्रादेशिक परिवहन विभागात फार मोठा गोंधळ आहे.  गैरव्यवहार व भ्रष्टाचार राजरोसपणे सुरू आहे. अनेकदा मी विधान परिषदेत तक्रारी केल्या. त्याची चौकशी सुद्धा झाली. लोडींग आणि अनलोडींगचा ठेका एका गुंडाला दिला असल्याचा आरोपही यावेळी एकनाथ खडसेंनी केला. यात खालपासून वरपर्यंत सर्वांचे हात भ्रष्टाचाराने बरबटले आहेत. ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी त्यामुळे हिला हात लावायला कुणी तयार नाही, असं ते म्हणाले.


एकच अभ्यासक्रम दीर्घ कालीन असला पाहिजे : एकनाथ खडसे


यावेळी एकनाथ खडसे यांनी आजच्या शिक्षण पद्धतीत होत असलेल्या बदलावर त्यांचे मत व्यक्त केले. वारंवार अभ्यासक्रम बदलामुळे शिक्षणावर अस्थिरता येते. त्यामुळेच एकच अभ्यासक्रम दीर्घ कालीन असला पाहिजे, असं मत व्यक्त करत याबाबत सरकारला मागणी करणार असल्याचेही खडसे म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Dhairyasheel Mane : खासदार धैर्यशील मानेंवर कमेंटमधून शिवसैनिकांचा सर्जिकल स्ट्राईक! सडकून ट्रोल झाल्याने कमेंट सेक्शन पुन्हा बंद
अकोला राष्ट्रवादीतील वाद नव्या वळणावर! मिटकरींवर आरोप केलेल्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांवर शिक्षिकेचे गंभीर आरोप