Ambadas Danve on Beed Tour: गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील शेतकऱ्यांची आत्महत्या करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचं समोर आलं आहे. 1 जानेवारी ते 25 ऑगस्ट या 237 दिवसात मराठवाड्यातील एकुण 626 शेतकऱ्यांनी आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलून आपलं जीवन संपवल्याचं भीषण वास्तव समोर आलं आहे. दरम्यान आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी विरोधी पक्षनेते दानवे हे आज रविवार 4 सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहे.
याबाबत बोलतांना दानवे म्हणाले की, शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. सत्तेत आल्यावर राजकारण करण्यात व्यस्त असलेल्या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. तर राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असल्याचा आरोपही अंबादास दानवे यांनी केला आहे. दरम्यान आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आपण आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार असल्याचं दानवे म्हणाले आहे.
मदतीसाठी हेलपाटे घालण्याची वेळ...
पुढे बोलतांना दानवे म्हणाले की,बीड जिल्ह्यात सर्वाधिक 157 आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे. शेतकरी आत्महत्येनंतरही लॅबकडे पाठविण्यात येत असलेला व्हिसेरा रिपोर्ट निरंक येत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर शेतकऱ्याच्या मदतीसाठीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे येण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आधीच घरातील कर्ता पुरुषाने आत्महत्या केल्याने खचलेल्या शेतकरी कुटुंबियांना सरकारी दरबारी मदतीसाठी हेलपाटे घालावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या घरी भेट देऊन त्यांच्या व्यथा जाणून घेण्याचं प्रयत्न करत असल्याचं दानवे म्हणाले.
शेतकरी आत्महत्या आकडेवारी...
मराठवाड्यात 237 दिवसात एकुण 626 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ज्यात सर्वाधिक बीड जिल्ह्यात 170 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तर एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात 109 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. तर जालना जिल्ह्यात 77, परभणीत 50, हिंगोली 24, नांदेड 89, लातूर 36 आणि उस्मानाबाद जिल्ह्यात 71 शेतकऱ्यांनी आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल उचलेले आहे.
पीडित मुलीचीही भेट घेणार...
तसेच बीड जिल्ह्यातील गेवराईत कॉफी शॉप मध्ये नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या पीडित मुलीला न्याय मिळावा यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पीडित मुलीची व कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
महत्वाच्या बातम्या...
धक्कादायक! मराठवाड्यात 237 दिवसांत 626 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील