Nagpur News Update : आधार कार्ड ( Aadhar Card) आपल्या नागरिकत्वाचा एक अत्यंत महत्वाचा पुरावा मानला जातो. शाळेच्या  प्रवेशासह विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी किंवा बँकेच्या व्यवहारासाठी आधार कार्ड असणे खूप गरजेचे आहे.  मात्र, एवढ्या महत्वाच्या या दस्तऐवजाबद्दल बोगसगिरी सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात समोर आला आहे. नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेकोसाबाग परिसरात एका भंगार खरेदी विक्रीच्या दुकानात मोठ्या प्रमाणात आधार कार्ड आढळली आहेत. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.


नागपुरातील आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते प्रभात अग्रवाल यांना परिसरात काही संशयीत बोगस आधार कार्ड तयार करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे  प्रभात अग्रवाल यांनी स्वतः त्याची शहनिशा करण्याचे ठरविले आणि छुप्या मोबाईल कॅमेराच्या मदतीने स्टिंग ऑपरेशन केले. त्यात भंगार दुकान मालकाकडे अनेकांच्या नावाचे आधारकार्ड तयार असून ते केवळ 20 रुपयांत विक्री केले जात असल्याचे समोर आले. त्यानंतर प्रभात अग्रवाल यांनी जरीपटका पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. पोलिसांनी भंगार दुकानात केलेल्या कारवाईत 90 आधार कार्ड जप्त केली आहेत.  


भंगारवाल्याचा दावा संशयास्पद 
मेकोसाबाग परिसरात कचरा वेचणाऱ्या अब्दुल मजीद अली नावाच्या व्यक्तीला कचऱ्याच्या ढिगार्‍यात आधार कार्डचा एक बंडल मिळाला होता. त्याने तो बंडल समोरच असलेल्या भंगार दुकानातील मालक आतिष कोटांगले याला दिले. भंगार दुकानाचा मालक आतिष याने त्या आधार कार्डवरील मोबाईल नंबरवर फोन करून ते आधार कार्ड 20 रुपयांचा मोबदला घेऊन विक्री केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे आधारकार्ड तयार करणारे आम्ही नाही तर दुसरे कोणीतरी आहेत अशी भूमिका भंगारवाल्याने घेतली आहे. त्याच्या दाव्याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. दरम्यान, एवढे आधार कार्ड कचऱ्यात कोणी आणि का फेकले? याबाबत पोलिसांना अध्याप माहिती मिळाली नाही. 


भंगारवाल्याला दावा खोटा ठरण्याची शक्यता  
दरम्यान, परिसरातील काही नागरिकांनी आतिष याच्याकडे आधार कार्डची मागणी केली. त्यांना पैसे घेऊन आधार कार्ड उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती दिली. त्यामुळे भंगारवाला ही आधारकार्ड अज्ञातांच्या मदतीने बनवत होता का? याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे. पोलिसांनी या प्रकरणी कचरा वेचणारा अब्दुल मजीद अली आणि भंगार दुकानाचा मालक आतिष कोटांगले या दोघांना ताब्यात घेत चौकशी सुरू केल्याची माहिती जरीपटका पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी एम. जी नाईकवाडे यांनी दिली आहे.    


आधार कार्डचा गैरवापर   
आधार कार्ड तयार करण्याची जबाबदारी आधार सेवा केंद्रांना देण्यात आली आहे. आधार सेवा केंद्र चालवणाऱ्यांनी लोकांचे अधिकृत कागदपत्रे तपासून त्यांचे आधार कार्ड तयार करून देणे अपेक्षित आहे. मात्र, ज्या पद्धतीने नागपुरातील प्रकरण समोर आले आहे, ते पाहता आधारकार्ड तयार करण्याची प्रक्रिया पारदर्शक नाही आणि काही चुकीचे लोक त्याचा गैर फायदा उचलून बोगस आधार कार्ड  तयार करत आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत.   


महत्वाच्या बातम्या


Covid vaccination : आधार कार्ड शिवाय 87 लाख नागरिकांचे लसीकरण, केंद्र सरकारचे SCला स्पष्टीकरण


Aadhaar Card : आधार कार्ड अपडेट करायचंय? मग 'ही' माहिती नक्की वाचा


मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक होणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय