Satya Pal Singh Attacked : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मैनपुरी येथील करहाल मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याविरुद्ध लढत असलेले भाजप उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री सत्यपालसिंह तथा एस. पी. सिंह बघेल ( Satya Pal Singh Baghel ) यांच्या ताफ्यावर मंगळवारी रात्री हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यातून बघेल थोडक्यात बचावले असून ते सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी बोलताना उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांनी या हल्ल्यामागे समाजवादी पक्षाचा हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच त्यांनी या हल्ल्यासाठी अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना जबादादार ठरवलं असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणाची माहिती देताना मैनपुरी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, केंद्रीय मंत्री एस. पी. सिंह बघेल यांचा ताफा अतिकुल्लारपूर येथून जात असताना हा हल्ला झाला आहे.
शंभरहून अधिक लोकांनी केली दगडफेक
एस. पी. सिंह बघेल हे प्रचारावरून अतिकुल्लारपूर येथून जात होते, त्यावेळी त्यांच्या ताफ्यावर हा हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी त्यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगफेक करत लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढवला. यानंतर काहीवेळातच हल्लेखोर तिथून पसार झाले. या हल्ल्यात शंभरहून अधिक लोक सामील असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ल्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलीस घटनास्थळाची पाहणी करत असून हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल - केशवप्रसाद मौर्य
या हल्ल्यानंतर केशवप्रसाद मौर्य यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ''मैनपुरीच्या करहाल विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री प्रोफेसर एसपी सिंह बघेल यांच्या ताफ्यावर हल्ला करून सपाच्या गुंडांनी आपले खरे चारित्र्य दाखवले आहे. कालच भाजप खासदार गीता शाक्य यांच्यावरही हल्ला झाला. या दोन्ही घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.'' दरम्यान, 20 फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
हेही वाचा :
- Amit Shah : दिल्ली पोलिसांनी अनेक दहशतवादी घटना हाणून पाडल्या, गृहमंत्री अमित शाह यांनी केल कौतुक
NSA Ajit Doval : मोठे षड्यंत्र? NSA अजित डोवाल यांच्या बंगल्यात घुसखोरीचा प्रयत्न, एक पोलीसांच्या ताब्यात
दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ED कडून अटकेची शक्यता, काय आहे प्रकरण?
- LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha