Sanjay Raut On President Election: ''राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. ही चर्चा दोन्ही बाजूनी झाली. द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांच्याबाबत चर्चा झाली. शिवसेनेने यापूर्वीही अनेकदा राजकारणापलिकडे जाऊन व्यक्ती म्हणून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांना आपलं पाठबळ दिलं आहे'', असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. आज मातोश्री (Matoshree) बंगल्यावर शिवसेना खासदारांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना कोणाला आपलं समर्थन देणार यावर चर्चा झाली. ही बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना संजय राऊत असे म्हणाले आहेत. 


राऊत म्हणाले की, ''राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली आणि सर्व खासदारांनी निर्णय घेण्याचे अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. उद्धव ठाकरे यांचे आदेश सर्व खासदारांना बंधनकारक आहे.'' ते म्हणाले, ''आमचे पक्षप्रमुख निर्णय घेण्यासाठी समर्थ आहेत. ते महाराष्ट्र आणि देशाच्या भावना समजून योग्य निर्णय घेतील. जो सर्व खासदारांना मान्य असेल.''   


हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्याचा शिवसेनेला कोणताही अधिकार नाही, असं शिंदे गटाचे शिवसेना आमदार संतोष बांगर म्हणाले आहेत. याबाबत प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, ''त्यांना बोलूद्या. त्यांची हकालपट्टी झाल्याची बातमी सामनामध्ये प्रसिद्ध झालेली आहे आणि ती पुरेशी आहे. नवीन जिल्हाध्यक्ष नेमले जातील. शिवसेना ही उद्धव आणि बाळासाहेब ठाकरे यांची आहे. दुसरी कोणाची नाही. पदावर ठेवण्याचे हटवण्याचे अधिकार पूर्ण अधिकार पक्षप्रमुखांना आहे. त्यानुसार हा निर्णय घेतला आहे. कोणाला वाटत असेल, त्यांना असे अधिकार नाही. तर तो त्यांचा भ्रम आहे.'' दरम्यान, मातोश्री बंगल्यावर आयोजित बैठकीला शिवसेनेचे 18 पैकी 5 खासदार गैरहजर होते. हे पाच खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून ते लवकरच त्यांच्या गटात सामील होतील अशी चर्चा आहे. तत्पूर्वी शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गटात सामील होणार असल्याचं सांगण्यात आलं होत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Shivsena : शिवसेनेची बैठक संपली, पाच खासदारांची दांडी, अनुपस्थित खासदार शिंदे गटाच्या गळाला लागणार का याकडे लक्ष