NCP On OBC Reservation : राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणाचं (OBC Political Reservation) भिजत घोंगडं आहे. असं असताना काही ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांचा विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मोठा निर्णय घेतला आहे. ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) एकूण उमेदवारांपैकी 27 टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी दिली आहे.
ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण सर्वचजण आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत व यापुढेही करत राहू असे आश्वासनही जयंत पाटील यांनी यावेळी दिले आहे.
ओबीसी आरक्षणाशिवाय येणाऱ्या निवडणूका होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे. आरक्षणाशिवाय निवडणूका होऊ नये अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याचेही जयंत पाटील यांनी अगोदरच जाहीर केले आहे.
राज्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणूका जाहीर
राज्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून 19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. या निवडणूकीची प्रक्रीया 20 जुलैपासून सुरु होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 20 जून रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार असून लगेच 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. पुणे (Pune), सातारा, सांगली(Sangli), सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे (Dhule), नंदुरबार, जळगाव (jalgaon), अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड (Beed), उस्मानाबाद, लातूर (Latur), अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहे.