Latur Lok Sabha Election 2024 : लातूर :  शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने (Dinkar Mane) यांची जीभ घसरली असून त्यांच्या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी, अजित पवार, अशोक चव्हाणांवर खालच्या भाषेत टीका करण्यात आली आहे. तसेच, भाजपचे लोक पैसे घेऊन आले तर पैसे घ्या आणि काँग्रेसलाच मतदान करा, असा अजब सल्लाही दिनकर मानेंनी कार्यकर्त्यांना दिला आहे. 


काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्ह्यात गेल्या दोन लोकसभा निवडणुकीमधील पराभवानंतर आता गेलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी महाविकास आघाडी करून जोरदार तयारी केली जात आहे. कार्यकर्त्यांच्या सभाही घेतल्या जात आहेत. त्या सभेत बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख तथा शिवसेनेचे माजी आमदार दिनकर माने यांची नरेंद्र मोदी, अजित पवार, अशोकराव चव्हाण यांच्याबद्दल बोलताना जीभ घसरली आहे. आरेतुरेची भाषा करत त्यांनी शिवीगाळ करत नरेंद्र मोदी, अशोक चव्हाण, अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. हे भाजपावाले पैसे घेऊन आले तर पैसे घ्या आणि मतदान काँग्रेसलाच करा, असा अजब सल्लाही कार्यकर्त्यांना दिला आहे. 


काय म्हणाले माजी आमदार दिनकर माने? 


माजी आमदार दिनकर माने म्हणाले की, "7 तारखेच्या आगोदर पंधरा लाख रुपये आमच्या खात्यावर टाका आम्ही तुम्हाला मतदान करू. लोकांनी आता भरपूर सहन केलं आहे. तीन महिन्याला दोन हजार रुपये देतो, म्हणून मोदी सांगतंय हरामखोर का? घरचं देत नाही. Dap खतांवर , पनीरवर GST लावली आहे. अरे कशा कशावर GST लावतोस." 


ना खाऊंगा, ना खाने दूंगा असे म्हणत सुटला आहे. संन्याशी आहे म्हणे एक बायको सांभाळता आली नाही आणि देश सांभाळायला निघाला आहेस. अशा खालच्या भाषेत नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार, जिल्हाप्रमुख दिनकर माने यांनी टिका केली आहे. 


"70 हजार कोटी रुपयाचा घोटाळा करणाऱ्या अजित पवार यांना भाजपनं महायुतीमध्ये घेतलं आहे, त्याला का घेतलं? असा प्रश्न उपस्थित करत धरणात पाणी कमी आहे, म्हणून घेतलं का? असा टोला उबाठाचे माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख दिनकर माने यांनी लगावला आहे. त्यासोबतच अशोकराव चव्हाण यांच्या बापाला मुख्यमंत्री केलं अशोक चव्हाण यांना दोन वेळा मुख्यमंत्री केलं तरी ते भाजपमध्ये गेले, अरे तुझ्यापेक्षा आम्हीच फाटके चांगले आहोत की...", असं म्हणत जोरदार टीका केली आहे. 


लोकसभा निवडणुकीत भाजपकडून पैसे कोणी दिले, तरी घ्या कोणी शपथ दिली तर शपथ घ्या, पण काँग्रेसलाच मतदान करा, असं धक्कादायक वक्तव्य करत कार्यकर्त्यांना पैसे घेण्याचा अजब सल्ला माजी आमदार तथा उबाठाचे जिल्हाप्रमुख दिनकर माने यांनी दिला आहे.