अमरावती : सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) धामधुमीत अमरावती (Amravati) या मतदारसंघाची चांगलीच चर्चा होत आहे. भाजपने (BJP) येथे विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना तिकीट दिले आहे. मात्र राणा यांच्या उमेदवीला महायुतीचाच (Mahayuti) भाग असलेल्या अनेक घटकपक्षांनी विरोध केला आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी तर काहीही झालं तरी आम्ही राणांचा प्रचार करणार नाही, असं सांगितलं आहे. त्यानंतर आता राणा यांना विरोध करताना कडू यांनी पहिल्यांदाच मोठं विधान केलं आहे. त्यांनी भाजप, शिवसेना (ठाकरे गट) या पक्षांना महायुतीतून बाहेर पडण्याचा इशार दिला आहे. ते 'एबीपी माझा'शी बोलत होते. 


...तर अमरावतीला चांगला खासदार मिळू शकतो


बच्चू कडू यांनी नवनीत राणांच्या उमेदवारीला थेट विरोध करत आम्ही अमरावतीतून दुसरा उमेदवार उभा करू असा इशारा दिला आहे. बच्चू कडून दिनेश बुब यांना तिकीट देण्याचा विचार करत आहेत. यावर बोलताना कडू म्हणाले की, दिनेश बुन यांना प्रहारकडून उमेदवारी द्यायची की नाही हे प्रहारचे आमदार राजकुमार पटेल सांगणार आहेत. दिनेश बुब माझा एक जवळचा मित्र आहे. त्यांचे व्यक्तीमत्त्व चांगले आहे. दिनेश बुब हे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करतात. त्यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य आरोग्यसेवेत घातलेले आहे. दिनेश बुब हे चांगले उमेदवार असू शकतात.त्यांच्या रुपात अमरावतीला एक चांगला खासदार मिळू शकतो, असे बच्चू कडू म्हणाले. 


आमचा राणा यांना विरोध कायम 


अमरावतीतून दिनेश बुब उभे राहिले तर एक लाट निर्माण होऊ शकते. मला एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आदर आहे. पण माझा पक्ष फुटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वेळ आल्यास मी महायुतीतूनही बाहेर पडायला तयार आहे, असं मोठं विधान कडू यांनी केलं. तसंच अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना आमचा विरोध कायम राहील, असंदेखील कडून यांनी ठणकावून सांगितलं.



....मग पाणी पाजतो म्हणायचं


बच्चू कडू तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते आनंदराव अडसूळ, अभिजित अडसूळ यांच्या भूमिकेमुळे नवनीत राणा यांची अडचण झाली आहे. त्यांनी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. यावर बोलताना कडू यांनी राणा यांच्यावर खोचक शब्दांत भाष्य केलं आहे. आधी जखमी करायचं. जिवंतच होऊ द्यायचं नाही. मग पाणी पाजतो म्हणायचं, असं चालू आहे, असं कडू म्हणाले. 


आता पुढे काय होणार?


दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून कडू हे नवनीत राणा यांना थेट विरोध करत आहेत. मात्र पहिल्यांदाच त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे भविष्यात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.