पुणे : राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटलांना (Dilip Walse Patil) शिरुर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आजारपणामुळे सहभागी होता आलं नाही, त्या दुःखी भावना सांगताना वळसे पाटील भावुक झाल्याचं दिसून आलं. आपण प्रचारात हजर राहू शकलो नाही असं सांगताना भर सभेत वळसे पाटलांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर सभेतील कार्यकर्त्यांमध्ये काही काळ शांतता निर्माण झाली. शिरुर लोकसभा मतदारसंघातून (Shirur Lok Sabha Election) अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजी आढळराव पाटील यांचा शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी पराभव केला.
शिरूरची लढत आणि पराभवानंतर आढळराव पाटील सोबत राहिल्याची आठवणी सांगताना मंचर येथील सहविचार सभेत दिलीप वळसे पाटलांना अश्रू अनावर झाले. या भावनिक प्रसंगानंतर सभेतील कार्यकर्तांमध्ये काही काळ शांतता निर्माण झाली.
काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?
पक्षाला मदत केल्याबद्दल दिलीप वळसे पाटलांनी शिवाजीराव आढळराव पाटलांचे आभार मानले. ते म्हणाले की, दुर्दैवाने मी आजारी असल्याने प्रचारात येऊ शकला नाही. थोडी अडचण झाली, पण नियतीपुढे काही इलाज नसतो. रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन मंचरला आलो आणि निवडणूक होईपर्यंत इथेच थांबायचं ठरलं. परंतु पुढे आणखी त्रास झाल्याने मला मुंबईतील रुग्णालयात जावं लागलं.
वळसे पाटलांच्या गावात अमोल कोल्हेंना मताधिक्य
शिरूरच्या प्रतिष्ठेच्या लढतीत शरद पवार गटाच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटलांचा लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला. विशेष म्हणजे अमोल कोल्हे यांनी दिलीप वळसे पाटलांच्या आंबेगावातही मताधिक्य घेतलं.
शरद पवारांचे विश्वासू समजले जाणाऱ्या दिलीप वळसे पाटलांनी राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांची साथ दिली. त्यानंतर शरद पवारांनी दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात सभा घेत त्यांच्यावर टीका केल्याचं दिसून आलं. वळसे पाटलांनी साथ सोडल्याची गोष्ट ही शरद पवारांच्या जिव्हारी लागल्याची चर्चा होती. त्यामुळेच शरद पवारांनी आक्रमक भूमिका घेत वळसेंवर टीका केली. त्याचसोबत पवारांनी देवदत्त निकम यांना बळ देण्याची भूमिका घेतली.
आंबेगाव विधानसभा मतदारसंघात शरद पवारांचे उमेदवार अमोल कोल्हेंना मताधिक्य मिळाल्याने त्याचा परिणाम आता विधानसभेच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. वळसे पाटलांसाठी ही धोक्याची घंटा असल्याचं सांगण्यात येतंय.
ही बातमी वाचा: