Dilip Walse Patil, Pune : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) मला जी जबाबदारी देतील, ती घ्यायला मी तयार आहे. असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे (Dilip Walse Patil) पाटलांनी मंत्री पदासाठी इच्छुक असल्याचं अखेर बोलून दाखवलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
दिलीप वळसे पाटील म्हणाले, माझी प्रकृती खालावलेली आहे, अशी अफवा पसरवली जातीये. मात्र माझी तब्येत उत्तम असून मी पूर्ण कार्यक्षमतेने काम करतोय. त्यामुळं वरिष्ठ देतील ती जबाबदारी स्वीकारायला मी तयार आहे. मला कोणतं पद द्यायचं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील. असं म्हणत मी मंत्री पदासाठी इच्छुक असल्याचं वळसेंनी अखेर बोलून दाखवलंय.
परभणीतील तणावाबाबत मला फारशी कल्पना नाही, मात्र राजकारणासाठी कोणी ही असे चुकीचे प्रकार करू नयेत, संयम बाळगून शांतता राखावी, असं आवाहन दिलीप वळसेंनी केलं. त्यासोबतच शरद पवारांवर वक्तव्य करणाऱ्यांनी सुसंस्कृतपणा राखावा, असा सल्लाही दिलीप वळसे पाटलांनी महायुतीतील वाचाळवीरांना दिला.
विधानसभा निवडणुकीत दिलीप वळसेंचा निसटता विजय
दिलीप वळसेंच्या एका डावाने देवदत्त निकमांचा विजय हिरावून घेतला होता. वळसेंनी देवदत्त जयवंतराव निकमांच्या विरोधात देवदत्त शिवाजी निकमांना अपक्ष म्हणून रिंगणात उभं केलं. विशेष म्हणजे शरद पवारांच्या देवदत्त निकमांचे चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस तर अपक्ष देवदत्त निकमांचे चिन्ह हे ट्रॅपेट होते. ट्रॅपेट हे चिन्ह लोकसभेवेळी तुतारी नावाने ओळखले जायचे. याचा फायदा वळसेंनी करून घेण्याची खेळी केली, जी वळसेंना तारणारी ठरली होती. कारण वळसेंचा विजय हा अवघ्या 1500 मतांनी झाला, तेव्हा अपक्ष देवदत्त शिवाजी निकमांना 2900 हून अधिक मतं मिळाली. शरद पवारांचे देवदत्त निकम यांच्यासमोर अपक्ष देवदत्त शिवाजी निकम हे साधर्म्य असणारे उमेदवार नसते तर साहजिकच ही 2900 मते शरद पवारांचे उमेदवार देवदत्त निकमांना मिळाली असती. त्यामुळं दिलीप वळसेंनी नावात साधर्म असणाऱ्या देवदत्त निकमांना उभं करण्याचा डाव टाकला नसता तर कदाचित वळसेंचा पराभव झाला असता. त्यामुळं शरद पवारांच्या देवदत्त निकामांविरोधात विजयी मिळवताना वळसेंना देवदत्त शिवाजी निकमांनी तारले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या