मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde Resign) यांनी आज अखेर आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh case) हत्येप्रकरणात, धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. त्याचबरोबर या प्रकरणापासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत होती, अशातच धनंजय मुंडे यांचा राजीनामा आधीच घेतला गेला पाहिजे असं मत नेत्यांनी व्यक्त केलं आहे. तर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुंडेंसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनांही त्यांनी घेरलं आहे. सुषमा अंधारे यांनी सोशल मिडियावरती पोस्ट करून फडणवीसांनी देखील राजीनामा द्यावा असं म्हटलं आहे.
त्याचबरोबर काल (सोमवारी) संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या केल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते, या फोटो आणि व्हिडिओनंतर संताप व्यक्त केला जात आहे, अशातच सगळी माहिती फोटो व्हिडिओ हाताशी असून सुद्धा अडीच तीन महिने देशमुख कुटुंबीय आणि महाराष्ट्राच्या भावनांशी खेळणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी आधी नैतिकता म्हणून राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
"आरोपीबद्दल खडान्खडा माहिती असताना सुद्धा फडणवीसांनी जाणीवपूर्वक पक्षीय अजेंडा राबविण्यासाठी मौन बाळगले. सगळी माहिती फोटो व्हिडिओ हाताशी असून सुद्धा अडीच तीन महिने देशमुख कुटुंबीय आणि महाराष्ट्राच्या भावनांशी खेळणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी आधी नैतिकता म्हणून राजीनामा द्यायला हवा", असंही सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांना हे सगळं आधीच माहीत होतं, मग 3 महिन्यांपासून मुंडे दोषी असतील तर राजीनामा घेतला जाईल असं वाक्य ते का उच्चारत होते? देवेंद्र फडणवीसांनी कोणता राजकीय अजेंडा राबवण्यासाठी देशमुख कुटुंबीय आणि महाराष्ट्राच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न केला, असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला आहे.
राजीनाम्यावर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया
राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पोस्ट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे."
देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे. आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेला आहे.