मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणावरुन राज्यातील व बीड (Beed) जिल्ह्यातील वातावरण तापलं असून राजकीय घडामोडीही वेगाने घडत आहेत. आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण चांगलच लावून धरलं असून त्यांच्या मागणीनुसार शासनाने याप्रकरणी नवीन एसआयटी गठीत केली आहे. त्यातच, धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केल्यानंतर, दुसरीकडे वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ आज त्याचे कार्यकर्तेही परळीत रस्त्यावर उतरले असून वाल्मिक कराडच्या आईनेच परळीतील पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, परळी व बीड जिल्ह्यातील वातावरण चिघळलं असून पोलिसांनीही फौजफाटा तैनात केला आहे. दरम्यान, परळीचे आमदार व कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी नुकतेच देवगिरी बंगल्यावर अजित पवारांची (Ajit pawar) भेट घेऊन परळीला मार्गक्रमण केलं आहे.  


मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी अजित पवारांसोबत केवळ 10 मिनिटे चर्चा केल्याची माहिती आहे. अजित पवार यांची भेट घेऊन सध्याची परळीतील परिस्थितीबाबत अजित पवार यांना अवगत करून मुंडे परळीच्या दिशेने निघाले आहेत. सध्याची परिस्थिती शांत झाल्यानंतर आपण परळीमध्ये पुढील 2 दिवसांत माध्यमांशी संवाद साधू अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी एबीपी माझाला दिली आहे. अजित पवारांची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडे थेट परळीला रवाना झाले आहेत. दिवसभरातील आजचा घटनाक्रम पाहता परळीतील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती लक्षात घेऊन धनंजय मुंडे तातडीने परळीला रवाना झाल्याचं सांगण्यात आलं.  


बीडमध्ये आज काय काय घडलं? 


वाल्मिक कराडला आज न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे, खंडणी प्रकरणात त्याच्या जामीनचा मार्ग मोकळा झाला असला तरी सीआयडीने मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या आहेत. वाल्मिकवर मकोका दाखल केल्यानंतर परळीत त्याच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं. यावेळी, काहींनी अंगावर ज्वलनशील पदार्थही ओतून घेतले. तसेच, वाल्मिक कराडच्या आईनेही रस्त्यावर उतरुन लेकावर दाखल केलेले गुन्हे खोटे असल्याचं म्हटलं. तर, वाल्मिक कराडची पत्नी मंजिली यांनीही पत्रकारांशी संवाद साधत एसआयटी प्रमुख बसवराज तेली यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. तेली हे आष्टीचे जावई असून त्यांचे आणि आमदार सुरेश धस यांचे सीडीआर तपासावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे, बीडमधील वातावरण तणावग्रस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेऊन परळीचा रस्ता धरला आहे. 


हेही वाचा


Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल