Devendra Fadnavis पानिपत: छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाचा इतिहास बदलला आहे. शिवाजी महाराजांना आई जिजाऊनी संस्कार दिले. शिवाजी महाराज राजा होण्यासाठी नाही तर देश धर्मासाठी लढले. शिवाजी महाराजांनी जाती पाती विसरून सर्वांना एकत्र केलं. त्यांनी मुघलांना पराजित करून स्वराज्य स्थापन केलं. आमचं हिंदू स्वराज्य, मराठी स्वराज्य त्यानंतर कधीही थांबलं नाही. मराठ्यांनी सगळ्या देशावर साम्राज्य स्थापन केलं. किंबहुना शिवाजी महाराज नसते तर संस्कृती, संस्कार देशात उरले नसते. मराठ्यांकडे मुलुख होता पण तरीही ते लढले. अब्दाली उत्तरेत राज्य करेल. परंतु मराठ्यांनी संकुचित विचार केला नाही. मराठ्यांनी मातृभूमीचा विचार केला. पोटात अन्न नसताना थंडीत अंगावर गरम वस्त्र नसताना मराठे लढले. त्यावेळी आम्ही एक असतो तर सेफ असतो असे गौरद्गार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis)पानिपतच्या रणभूमीवरुन केले आहे.
पानिपतच्या लढाईत मराठ्यांनी गाजवलेल्या पराक्रमाची आठवण म्हणून आज पानिपत युद्ध स्मारकावर शौर्य दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि अन्य प्रमुख पाहुण्यांनी उपस्थिती लावली. यावेळी बोलताना फडणवीसांनी हे वक्तव्य करत इतिहासातील पराक्रमाला उजाळा दिला आहे.
आपल्याला विभाजित करणाऱ्यांपासून सावध रहा- देवेंद्र फडणवीस
पानिपतच्या लढाईत लाखोंची कत्तल झाली. आम्ही मोहीम हरलो, लढाई मात्र जिंकलो. दहा वर्षात महादजी शिंदेंनी भगवा फडकवला, मराठ्यांनी देशात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मात्र त्यावेळी आम्ही एक असतो तर सेफ असतो, आमचं स्वप्न अखंड भारताचे होतं. त्यामुळे आपल्याला विभाजित करणाऱ्यांपासून सावध रहा. भविष्यात महाराष्ट्र सरकार इथे कार्यक्रमाचे आयोजन करेल. इथे शिवाजी महाराजांची प्रतिमा असली पाहिजे. हे केवळ मराठीचे राज्य नव्हते, तर संपूर्ण देशाचे हिंदवी स्वराज्य होते. गेल्यावर्षी इथे येण्याचा कार्यक्रम ठरवलेला, पण आयत्यावेळी रद्द झाला. बहुतेक वीरांची इच्छा होती उपमुख्यमंत्री नाही, मुख्यमंत्र्यांनेच इथे येऊन आम्हाला नमन केल पाहिजे. असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.
हे ही वाचा