कोल्हापूर : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास वेगाने सुरु असून सीआयडीच्या तपासात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यातच, आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तर, हत्येच्या अगोदर वाल्मिक कराडच्या कार्यालयात विष्णू चाटे, वाल्मिक कराड आणि खुनातील आरोपी घुले यांची बैठक झाल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमुळे पुन्हा वातावरण तापलं असून धनंजय मुंडेंच्या (Dhananjay munde) राजीनाम्याची मागणी केली जात आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje) यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडे फार मोठं मोठं बोलतात, पण त्यांनी नैतिक दृष्टिकोनातून आपला राजीनामा द्यावा, असे संभाजीराजेंनी म्हटलं आहे.
वाल्मिक कराडचा जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यामधून हत्येत कराडचे कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे, वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करावा. आता तरी धनंजय मुंडे यांनी मंत्री पदावर राहून उपयोग नाही, टप्प्याटप्प्याने सर्वच बाबी समोर येत आहेत. मुंडे यांच्यासंदर्भात सरकारने निर्णय घेण्याची वेळ आली आहे. धनंजय मुंडे फार मोठं मोठं बोलत आहेत, पण त्यांनी नैतिक दृष्टिकोनातून आपला राजीनामा द्यावा, अशी मागणी संभाजीराजेंनी केली. यापूर्वी अनेक मुख्यमंत्र्यांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला आहे, मग धनंजय मुंडे राजीनामा का देत नाहीत. धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा इतका गोडवा का लागलाय हेच कळत नाही. धनंजय मुंडे यांनी माझे आणि वाल्मिक कराडचे संबंध नाहीत हे जाहीर करावे. धनंजय मुंडेंनी स्वतःचं वटमुखत्यार पत्र वाल्मिक कराडला दिले आहे, इतके स्ट्राँग संबंध असताना देखील मुंडे राजीनामा का देत नाहीत. देशात या खून प्रकरणाची चर्चा सुरू आहे तरी तुम्हाला या खुर्चीवर का बसायचं आहे. अजित पवार आणि मुख्यमंत्री मुंडेंना संरक्षण का देत आहेत हेच कळत नाही, याबद्दल मला आश्चर्य वाटते, अशा शब्दात संभाजीराजेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच सवाल केले आहेत.
मुंडेंना बिटवीन द लाईन्स कळत नाही का?
धनंजय मुंडे क्लिअर असते तर त्यांना पालकमंत्री पद दिलं गेलं असतं, धनंजय मुंडेंना बिटवीन द लाईन्स कळत नाहीत का?. धनंजय मुंडे दोषी आहेत म्हणूनच त्यांना पालकमंत्री पद दिले गेले नाही. अजूनही सरकार नकळत वाल्मीक कराडला प्रोटेक्शन देत आहे का?. सगळे धनंजय मुंडे यांचे नाव घ्यायला घाबरत होते, पण मी जाहीरपणाने मुंडे यांचे नाव घेतले. कारण खरं ते बाहेर येणार आहे. मुंडे यांना पालकमंत्री पद दिले तर बीडचे पालकमंत्री पद मी घेईन असं स्पष्ट केलं होतं, असेही संभाजीराजेंनी सांगितलं. दरम्यान, याप्रकरणी मनोज जरांगे पाटील आपल्या मार्गाने लढा देत आहेत त्यांना आपल्या शुभेच्छा, असेही संभाजीराजेंनी म्हटलं.
विशाळगडावरील अतिक्रमण निघालंच पाहिजे
गडकोट किल्ले हे शिवाजी महाराजांचे जिवंत स्मारके, या गडकोट किल्ल्यांमुळेच हिंदवी स्वराज्य स्थापन झाले. सरकारने गडकोटा संदर्भात जो निर्णय घेतला त्याचं मी स्वागत करतो. पण, या संदर्भात सरकारने भूमिका घ्यावी. विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात मी कायदा हातात न घेता तिथे अनेक गोष्टी घडल्या, तिथलं वातावरण फार गढूळ झालं. दोन धर्माच्या लोकांमध्ये तेढ निर्माण झाला, ते होऊ नये याची खबरदारी सरकारने घ्यावी. पण याचा अर्थ असा नाही की वातावरण गढूळ होईल म्हणून अतिक्रमण काढायचं नाही, अतिक्रमण हे निघालच पाहिजे. पूर्वापार ज्यांचा रहिवास गडावर आहे, अशा लोकांना गडावर राहण्याचा अधिकार आहे पण त्याच्या नोंदी पाहिजे.व्यवसायिक दृष्टिकोनातून ज्यांनी कोणी अतिक्रमण केले आहेत त्यांचे अतिक्रमण तिथे राहू नये, असेही संभाजीराजेंनी स्पष्ट केलं.
हेही वाचा
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न