पुणे: बारामतीती कृषी प्रदर्शनानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकाच मंचावर दिसणार आहे. त्याचबरोबर यावेळी होणाऱ्या कार्यक्रमाला अजित पवारांशी (Ajit Pawar) संबंधित असलेल्या कारखान्याला शरद पवारांच्या (Sharad Pawar) हस्ते पुरस्कार देखील दिला जाणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ उद्या (गुरुवारी 23) सकाळी अकरा वाजता पार पडणार आहे.


या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह साखर उद्योगातील इतर नेते उपस्थित असणार आहेत. शरद पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष तर दिलीप वळसे पाटील हे उपाध्यक्ष आहेत. व्हीएसआयकडून 2023-2024 या वर्षाच्या गळीत हंगामात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पहिल्या क्रमाकांचा पुरस्कार अहिल्यानगर जिल्ह्यातील अंबालिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कारखान्याला जाहीर करण्यात आला आहे. हा साखर कारखाना अजित पवारांशी संबंधित मानला जातो. 


अजित पवार या कारखान्याच्या संचालक मंडळावर नसले तरी त्यांचे अनेक विश्वासू सहकारी संचालक म्हणून या कारखान्याचे काम पाहतात. अजित पवारांचे विश्वासू जंगल वाघ हे या कारखान्यचे सीईओ असून अजय कांगलकर आणि दिलीप भोसले हे संचालक आहेत. 2021मध्ये काटेवाडीत राहणाऱ्या जंगल वाघ यांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी देखील केली होती. दुसरा क्रमांक जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखान्याला तर तिसरा क्रमांक धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील न्याचरल शुगर्स एन्ड अलाइड इंडस्ट्रीजला जाहीर झाला आहे. या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा शरद पवार, अजित पवार, यांच्यासह अन्य नेते एकाच व्यासपिठावरती असणार आहेत. 


काका पुतणे येणार एकाच व्यासपिठावर


पुण्यात होणाऱ्या या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे एकत्र एकाच व्यासपिठावर असणार आहेत. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (वीएसआय)येथील होणाऱ्या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार एकाच मंचावर दिसणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (वीएसआय) वार्षिक सभा व पारितोषिक वितरण समारंभ 23 जानेवारी रोजी होणार आहे. 


शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सभा आणि पारितोषिक समारंभ संपन्न होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, बाबासाहेब पाटील आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (वीएसआय)चे विश्वस्त दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित राहणार आहेत. ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदार, संस्थेतील शास्त्रज्ञ व कर्मचारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार वितरीत केला जातो. या समारंभाला राज्यस्तरीय ऊस भूषण पुरस्कार सुद्धा देण्यात येणार आहे.