मुंबई: मंत्रालयामध्ये (mantralaya) नवीन फेशिअल रेकेग्निशन सिस्टीमच्या अंमलबजावणीमुळे सामान्य नागरिकांना प्रवेश घेणे कठीण झाले असताना, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (narhari zirwal) यांनी सुरक्षा नियमांचे उल्लंघन करत मंत्रालयात प्रवेश केला. मंत्री झिरवाळ यांनी पन्नास-साठ कार्यकर्त्यांसोबत मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या व्हीव्हीआयपी गेटमधून थेट प्रवेश केल्याची माहिती समोर आली होती. गेटवरील पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या प्रवेशावर आक्षेप घेतला, मात्र मंत्र्यांनी दादागिरी करत सर्व कार्यकर्त्यांना प्रवेश मिळवून दिल्याच्या चर्चा आहेत. यामुळे मंत्रालयात सुरू असलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मंत्री नरहरी झिरवाळ (narhari zirwal) यांचा लोकांना मंत्रालयात समोरच्या गेटने आत घेतानाचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्याने सामान्यांसाठी वेगळा न्याय आणि मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना वेगळा न्याय असं म्हणत टीका होत होती.
झिरवाळ यांच्या कार्यालयाचं स्पष्टीकरण
दरम्यान, पास शिवाय लोकांना आत घेतलं कसं? याबाबत मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयाशी एबीपी माझाकडून संपर्क करण्यात आला. झिरवाळ यांच्या कार्यालयांकडून व्हायरल फोटोबाबत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. सर्वसामान्य नागरिकांना मंत्रालयात दुपारी 2 नंतर प्रवेश, मात्र मंत्र्यांसोबत आलेल्या लोकांची मंत्रालयात वेळेपूर्वी महत्वाची बैठक होती. गोसावी समाजाच्या मागण्यांबाबत बैठक असल्याने मंत्र्यांकडून सुरक्षा रक्षकांना विनंती करून मंत्रालयात गोसावी समाजातील लोकांना घेण्यात आलं. मागील अनेक वर्षापासून गुरांबाबतचा गोसावी समाजाचा प्रश्न प्रलंबित आहे. यावर तोडगा काढण्यासाठीच संबंधित शिष्टमंडळाला विनंती करून घेण्यात आलं, असं स्पष्टीकरण झिरवाळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलं आहे.
मंत्रालयात पास असलेल्या व्यक्तींना प्रवेश मिळणे कठीण
मंत्रालयात नवीन फेशिअल रेकेग्निशन सिस्टीममुळे केवळ पास असलेल्या व्यक्तींना प्रवेश मिळणं कठीण झालं आहे. यामुळे व्हिजिटर्सना आरएफआयडी कार्डसह प्रवेश मिळवणे अपेक्षित आहे. तरीही, मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सुरक्षा नियमांची पायमल्ली करत थेट गेटवरील पोलिसांच्या आक्षेपानंतरही कार्यकर्त्यांना प्रवेश दिला असल्याच्या चर्चा होत्या. त्याचबरोबर त्यांचे कार्यकर्त्यांना गेटमधून आत घेतानाचे फोटो व्हायरल झाले होते. त्याचबरोबर झिरवाळ यांनी रजिस्टरमध्ये फक्त एक कार्यकर्त्याचे नाव नोंद करून, इतरांना सोबत नोंदवून प्रवेश दिला. मंत्रालयात प्रवेश करतांना सुरक्षा तपासणीचे नियम पाळले जात नाहीत, अशी टीका केली जात आहे.
मंत्रालयात लॅम्बोर्गिनीची एन्ट्री; कुठलीही चेकिंग न करता थेट प्रवेश
काही दिवसांपुर्वी मंत्रालयामध्ये एक आलिशान लॅम्बोर्गिनी कार आली होती. त्याला काळ्या काचा होत्या, त्या कारची कोणतीही चेकींग झाली नव्हती. मंत्रालयात जर कुठलीही गाडी येणार असेल तर त्या गाडीचा पास काढावा लागतो किंवा स्पेशल पास घ्यावा लागतो. जर सर्वसामान्यांना मंत्रालयात यायचं असेल तर पास काढणे आवश्यक आहे. सर्व अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. मात्र ही आलिशान कार मंत्रालयाच्या गेटवर आल्यानंतर त्यावेळी कुठल्याही प्रकारची कारची चेकिंग करण्यात आली नाही. ही कार थेट मंत्रालयामध्ये दाखल झाली. भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना या गाडीतून भेटण्यासाठी व्यक्ती आलेली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हीच व्यक्ती कार चालवत आतमध्ये आली मात्र आणखी कोणी कारमध्ये होते का? याबाबत अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.