सोलापूर : लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांनी जाहीर सभांचा धडाका लावला आहे. गुरुवारी दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंके यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतल्यानंतर आज माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी शरद पवारांनी सभा घेतली. या सभेत अनेक नेत्यांची भाषण झालं. उत्तम जानकर (Uttam jankar) यांनीही नागपूर, दिल्ली, माढा असा प्रवास उलगडला. तर, धैर्यशील मोहित पाटलांनी (Dhairysheel mohite patil) अस्सल गावरानस्टाईल भाषण करत निवडणूक लढविण्याच्या निर्धारावर भाष्य केलं. जिल्ह्यातील बदलतं राजकारण सांगत, मी निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला, याचीही उकल केली. यावेळी, नाव न घेता भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केला.
शरद पवारांनी सभेला संबोधित करताना करमाळा तालुक्याचे आणि माझे कसे नाते आहे. आपल्याला करमाळा तालुक्याच्या विकासासाठी अजुन नवनवीन कामे करायची आहेत. आपण सर्वजण मिळून महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे म्हटले. यावेळी भाषण करताना धैर्यशील मोहिते पाटंलांनी जिल्ह्याचं राजकारण सांगितलं.
सध्या, कोण बी उठतंय बोगद्याचा दरवाजा उघडतंय, कोण बी उठतंय कॅनोलचा दरवाजा उघडतंय, कोण बी उठतंय धरणाचा दरवाजा उघडतंय. यावर्षी उजनी धरण 68 टक्के भरलं होतं, वर्षाचं नियोजन व्हायला पाहिजे होतं. तरीही पाण्याची कमतरता आपल्याकडं होती, असे म्हणत जिल्ह्यात नेतृत्वाची घडी विस्कटल्याचं मोहिते पाटलांनी म्हटलं. ''जिल्ह्याला एक मालक नाही, एक विचार नाही, अनेक मालकं झाली आहेत. जी ती उठतंय आपल्या तालुक्याचं बघायला लागलंय. सध्या जिल्हा म्हणून, जिल्हा म्हणून, जिल्ह्याचा विकास म्हणून काहीच होत नाही. गेल्या 10 वर्षात एकमेकांची जिरवायची अन् एकमेकांचं बघायचं एवढचं धोरण दिसून येतंय. करमाळ्यातील अनेक गावांत काही तरुण पोरं भेटली, ही निवडणूक तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी लढायची नाही, तर साहेबांसाठी निवडणूक लढवायची आहे. मी जिल्ह्यातील लोकांची जनभावना दादांच्या कानावर घातली, तेव्हा दादांनी जनतेसोबत जायचंय, अडचणीच्या काळात साहेबांसोबत राहायच असल्याचं मला सांगितलं. त्यानंतर, 11 एप्रिल रोजी साहेबांकडे गेलो, साहेबांनी मला तयारीला लाग म्हणून सांगितलं. त्यानंतर, मी पायाला भिंगरी लावून पळायला लागलोग,'' असा किस्सा धैर्यशील मोहिते पाटलांनी निवडणूक लढवण्याचा सांगितला. यावेळी, सध्या घरफोडे भरपूर झाले आहेत अन् घरमालकालाच सांगतात की हे घर तुझं नाही, असे म्हणत नाव न घेता भाजपा नेत्यांवर हल्लाबोल केला.
रणजीतसिंह नाईकांवर निशाणा
सांगोल्यात किसान रेल्वे होती, डीपीडीसीच्या बैठकीत आम्ही हा प्रश्न उपस्थित केला. यांदर्भात खासदार उत्तर देतील असं सांगण्यात आल. त्यावर, खासदार म्हणाले ती स्कीम बंद झाली... खासदाराला जनतेबद्दल एवढी आपुलकी आहे असे म्हणत धैर्यशील मोहिते पाटलांनी रणजीतसिंह नाईक निंबाळकरांवर निशाणा साधला.
काय म्हणाले शरद पवार
मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असताना (सन 1972) मी नेहमी करमाळा तालुक्याच्या दौऱ्यात येत असे. या भागात मी, नामदेवराव जगताप आणि शंकरराव मोहिते पाटील यांनी एकत्र काम केलं आहे. दुष्काळी काळात येथे रोजगार हमी योजनेतून 5000 हजार लोकांना रोजगार दिला होता. तसेच येथील गुरांना चांगला चारा मिळावा म्हणून गुजरात येथील अमुल संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध केला होता, अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.