Madha Lok Sabha Constituency: सोलापूर : भाजपकडून (BJP) माढा लोकसभेच्या (Madha Constituency) उमेदवारीबाबत नकार मिळाल्यानंतर मोहिते पाटील परिवार उमेदवारीसाठी गंभीर बनलं असून आज धैर्यशील मोहिते पाटील हे सातारा जिल्ह्यातील (Satara District) माण तालुक्याच्या (Mann Taluka) दौऱ्यावर असणार आहेत. आज त्यांच्या चुलत भगिनी स्वरुपारानी मोहिते पाटील (Swaruparani Mohite Patil) या माळशिरस तालुक्यात दौरा करत आहेत, तर पत्नी शितलादेवी या पंढरपूर (Pandharpur News) तालुक्यात दौऱ्यावर असणार आहेत. गेल्या तीन दिवसांपासून मोहिते पाटील परिवारानं करमाळा, माढा, सांगोला या तीन तालुक्यात गावभेटींचा पहिला टप्पा पूर्ण करत आता माण आणि पंढरपूर तालुक्यात दौऱ्यास सुरुवात केली आहे. 


विशेष म्हणजे, भाजपकडून उमेदवारी मिळालेले खासदार रणजित निंबाळकर यांनी टेम्भूर्णी येथे एक महायुतीची बैठक घेतल्यानंतर त्यांच्या गोटात अजूनही शांततेचे वातावरण आहे. आघाडी मधून शरद पवार यांनी अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नसली तरी रासप नेते महादेव जानकर आणि शेकापचे डॉ. अनिकेत देशमुख हे उमेदवारीसाठी प्रयत्नात आहेत. मात्र, भाजपकडून मोहिते पाटील यांच्याबाबत कोणताही निर्णय होत नसल्यानं शरद पवार यांनी अजून आपले पत्ते ओपन केलेले नाहीत. मोहिते पाटील यांना विविध तालुक्यांच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांच्याकडून शरद पवार यांची तुतारी हातात घेऊन निवडणूक लढवण्याबाबत आग्रह होताना दिसत आहे. तरी धैर्यशील मोहिते पाटील यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. आपण सध्या मतदारसंघात फिरून मतदारांची मतं जाणून घेत आहोत, असं सांगत त्यांनी लोकसभा लढवणार का? आणि कोणत्या पक्षाकडून लढणार याबाबत "नो कमेंट" एवढंच उत्तर देणं पसंत केलं आहे. 


आज धैर्यशील मोहिते पाटील हे माण तालुक्यातील वडूज, नायकाचीवाडी, नागाचे कुमठे, सिद्धेश्वर कुरोली, औंध, गोपूज आणि उंबर्डे या ठिकाणी भेटी देणार आहेत. माण तालुक्याचे भाजप आमदार जयकुमार गोरे हे विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. धैर्यशील मोहिते पाटील हे त्या ठिकाणी विजयदादा यांच्या समर्थकांच्या मदतीनं माण तालुक्यात उतरत आहेत. यापूर्वी विजयदादा हे 2014 साली माढा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आल्यानं मोहिते पाटील यांना सगळे तालुके आणि मतदार चांगल्या रीतीनं माहीत आहेत. त्यामुळे दादांना साथ देणाऱ्या जुन्या सहकाऱ्यांसोबत आज धैर्यशील मोहिते पाटील हे माण तालुक्यात प्रचाराचा धडाका लावणार आहेत. 


मोहीते पाटील कुटुंबाकडून दौऱ्यांचा झंझावात


धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भगिनी आणि अकलूज येथील शिक्षण संस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या स्वरुपारानी मोहिते पाटील या मोहिते पाटील यांच्या होम ग्राऊण्ड म्हणजेच, माळशिरस तालुक्यात आज प्रचारासाठी उतरणार असून जवळपास 14 गावांचा दौरा करणार आहेत. धैर्यशील यांच्या पत्नी शितलादेवी यांनी माढा लोकसभेत असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील 10 गावांमध्ये आज भेटी घेणार आहेत. काल रात्री धैर्यशील मोहिते पाटील यांना सांगोला तालुक्यातील वाढेगाव परिसरात मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीसमोर गाजर आणि टोमॅटो टाकण्याचा प्रयत्न केला. असं असलं तरी मोहिते पाटील यांनी आपले दौरे सुरूच ठेवले असून आता भाजप उमेदवार त्यांच्या प्रचाराला सुरुवात कधी करणार? याकडे सगळ्यांचं लक्ष असून भाजप उमेदवारी बदलणार का? मोहिते पाटील पुन्हा स्वगृही परतून हाती तुतारी घेणार याचा निर्णय आज किंवा उद्या शरद पवार यांच्या उमेदवारीच्या घोषणेनं दिसणार आहे. 


पाहा व्हिडीओ : Madha Lok Sabha : माढ्याचा तिढा कोणता नेता सोडवणार? Mandar Gonjari वास्तव भाग 10