नागपूर : आगामी निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर मनसे-भाजप (MNS-BJP Alliance) युतीच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप-मनसे युतीच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा अजेंडा घेतल्याने जवळीक वाढली. मोदींना पंतप्रधान करण्याची भूमिका राज ठाकरेंनी घेतली होती. राज ठाकरेंनी मोदींना पाठींबा द्यावा ही अपेक्षा असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 


राज ठाकरे पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील


नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे. मोदींजीच्या सभेने भाजपच्या विजयाची अनुकूलता मोठ्या विजयामध्ये परिवर्तित होईल, यामध्ये शंका नाही.  पंतप्रधानांच्या दोन सभेमुळे विदर्भाला भाग ढवळून निघेल. राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा अजेंडा घेतल्याने जवळीक वाढली. ते पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील, ही अपेक्षा आहे.


राज ठाकरेंनी 2014 मध्ये मोदींना समर्थन दिलं


मनसे युतीच्या चर्चेवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनसेसोबत गेल्या काही काळात चर्चा झाली आहे. मनसेने हिंदुत्वाचा अजेंड्या घेतल्यावर त्यांची आणि आमची जवळीक वाढली आहे. राज ठाकरे यांनी 2014 मध्ये मोदींजींना समर्थन दिलं होतं. मोदीजी पंतप्रधान व्हावे,अशी राज ठाकरेंची इच्छा होती, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.


मनसे-भाजप युतीची घोषणा होणार का?


गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात बऱ्याच हालचाली पाहायला मिळत आहे. त्यातच मनसे-भाजप युतीच्या चर्चांनाही उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांनी दिल्लीत भाजपच्या दिग्गज नेत्यांची भेट घेतल्या, यानंतर लवकरच भाजप आणि मनसे होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. आता गुढीपाडव्याला मनसेची सभा आहे, या दिवशी मनसे-भाजप युतीची घोषणा होणार का आणि राज ठाकरे पंतप्रधान मोदींना पाठिंबा देणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


राज ठाकरेंच्या पाठिंब्याची फडणवीसांना आशा 


देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मनसे राज ठाकरेंचा पक्ष आहे, त्यासाठी त्यांना विचार करावा लागेल. पण, राज ठाकरेंना देखील आज हे मान्य असेल की, पंतप्रधान मोदींनी गेल्या 10 वर्षात जो विकास केला आहे आणि नवीन भारताची निर्मिती झाली आहे. अशा परिस्थिती सर्व लोकांनी मोदींच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. ज्यांच्यासाठी समाज आणि राष्ट्र प्रथम आहे,  अशा विचाराने प्रेरित सर्व लोकांनी मोदींसोबत राहायला हवं. मला विश्वास आहे की, राज ठाकरे आणि मनसे पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील. मला अपेक्षा आहे की, राज ठाकरे यावेळी मोदींना पाठिंबा देतील, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.