नागपूर: परभणी हिंसाचारप्रकरणात पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण खुलासा केला. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीमुळे झालेला नाही. न्यायालयीन कोठडीत असताना त्यांच्या छातीत अचानक जळजळ सुरु झाली आणि रुग्णालयात नेण्यापूर्वी सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते शुक्रवारी विधानसभेत बीड-परभणी प्रकरणावरील चर्चेवेळी बोलत होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू कसा झाला, याचा तपशील सभागृहात मांडला. सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हे आंदोलक होते. ते कायद्याचे शिक्षण घेत होते. ते मूळचे लातूरचे होते, त्यांचे कुटुंब आहे, ते पुण्यातही राहायला होते. सोमनाथ सूर्यवंशी हे परभणीत शिक्षण घेत होते. त्यांच्यासंदर्भात वस्तुस्थिती अशी आहे की, परभणीत जी जाळपोळ सुरु होती, त्या व्हिडीओत सूर्यवंशी दिसत असल्याने त्यांना अटक करण्यात आली. सूर्यवंशी यांना दोनवेळा मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले. त्यांच्या ऑर्डरची कॉपी माझ्याकडे आहे. दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना विचारले की, पोलिसांनी तुम्हाला थर्ड डिगरी मारहाण केली का, तुम्हाला मारहाण झाली का? सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीत असतानाचे फुटेजही उपलब्ध आहे. त्यांना कुठेही मारहाण झाल्याचे दिसत नाही. पोस्टमार्टेम अहवालाचे पहिले पान सगळ्यांनी वाचले असेल. पण सूर्यवंशीच्या वैद्यकीय तपासणीत लिहले आहे की, त्यांना श्वसनाचा दुर्धर आजार होता. वैद्यकीय अहवालात त्यांच्या जुन्या जखमांचाही उल्लेख आहे. त्यांच्या एका खांद्याजवळचे हाडही तुटले आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी असताना सकाळी छातीत जळजळ सुरु झाली. त्यावेळी पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले, त्यांना तिकडे मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी करणार: देवेंद्र फडणवीस
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर अनेक शंका तयार झाल्या आहेत. ते आरोपी असले तरी गरीब होते आणि वडार समाजाचे होते. पैशांनी जीव परत येत नाही. पण राज्य सरकार सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत करेल. या प्रकरणात उपस्थित झालेल्या शंकांचे निरसन झाले पाहिजे. या सगळ्याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आणखी वाचा
PI अशोक घोरबांड यांना सस्पेंड करुन चौकशी करणार, परभणी राड्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही!