नागपूर: परभणीमधील स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्याचा प्रकार काही दिवसांपुर्वी समोर आला होता. त्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. शहरातील काही दुकाने आणि वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. संतप्त जमावाने एसटी बसवरही दगडफेक केली होती. दरम्यान या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर आता परभणीतील या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार धरून परभणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (एलसीबी) पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली जात होती, त्याबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी वक्तव्य करत चौकशी करणार असल्याची माहिती दिली आहे.
परभणीतील घटनेबाबत बोलतना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला बाळासाहेब आंबेडकरांचा फोन आला आणि मला बाळासाहेबांनी सांगितलं, मला माहिती मिळाली आहे की, कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे. मी तात्काळ पोलिसांशी बोललो. त्यांना विचारलं कसलं ऑपरेशन सुरू आहे, तर पोलीस म्हणाले व्हिडिओमध्ये दिसत आम्ही त्यांना पकडतोय, मी त्यांना सांगितलं त्याचा संदेश चांगला जात नाही. त्यानंतर आयजी, माझं आणि बाळासाहेब आंबेडकरांचं एकत्रित बोलणं झालं, आणि सहा वाजेनंतर कुठल्याही वस्तीमध्ये कोणीही गेलेलं नाही. सहा वाजल्यानंतर कोणाला अटकही केलेली नाही. त्यामुळे अशा प्रकारचा कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले हे सांगणं योग्य नाही किंवा हे वस्तुस्थितीला धरून नाही, असं फडणवीस म्हणालेत.
त्यामध्ये एक तक्रार आलेली आहे, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी वाजवीपेक्षा जास्त त्यांनी बळाचा वापर केला निश्चितपणे याची चौकशी केली जाईल आणि चौकशी होईपर्यंत अशोक घोरबांड यांना निलंबित केला जाईल. त्यांना निलंबित करून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल त्यांनी वाजवी पेक्षा अधिक बळाचा वापर केला आहे का, याची चौकशी होईल असे पुढे देवेंद्र फडणवीस आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
परभणीमध्ये मंगळवारी 10 डिसेंबरला स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली. या विटंबनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी 11 डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान परभणीत जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यानंतर परभणी पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन राबवत गुन्हे दाखल केले आणि त्यांना अटक केली.
अटक केलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या 35 वर्षीय तरूणाचा रविवारी सकाळी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशीच्या शरीरावर अनेक जखमा असल्याने सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जात असून सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार धरून परभणी एलसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली होती.