मुंबई: मी काहीही विसरत नाही, जर विसरलो असतो तर हे सरकार बनलंच नसतं. मी जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा तेव्हा कागदपत्र घेऊनच उतरतो असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला. देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिक इंडिया या वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. या मुलाखतीत त्यांनी 2024 मध्ये मुख्यमंत्री कोण असेल, अजित पवार प्लॅन बी आहेत का? रश्मी ठाकरे यांची चौकशी होऊ शकते का? पहाटेच्या शपथविधीमध्ये शरद पवारांचा रोल काय होता याबाबतच्या प्रश्नांना उत्तरं दिली. 


उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज


माझं उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज आहे. माझ्या परिवाराबाबत काही असेल तर समोर आणा. मी मैदानात उतरतो तेव्हा कागदपत्र घेऊन उतरतो. पुढे येईन तेव्हा कागदपत्र घेऊन येईन, असं आव्हान फडणवीसांनी दिलं. मी काचेच्या घरात राहात नाही, तुम्हीकाचेच्या घरात राहता, माझं आयुष्य तर ओपन आहे, असं फडणवीस म्हणाले. 


रश्मी ठाकरेंना चौकशीला बोलवणार? 


रश्मी ठाकरेंच्या अलिबागच्या कथित 19 बंगल्यांबाबत गुन्हा दाखल आहे. चार्जशीटपर्यंत पोहोचलं आहे. रश्मी ठाकरेंना चौकशीला बोलवायचं की नाही हे सरकार नाही पोलीस ठरवतं. उद्धव ठाकरे त्यांच्या काळात पोलिसात हस्तक्षेप करत होते, मात्र आम्ही करत नाही. मात्र कुठल्याही प्रकरणात कोणीही दोषी आढळलं तर त्याला सोडणार नाही, असं फडणवीस म्हणाले. 


जिथे कोणी दोषी आढळले, ज्यांचा समावेश किंवाइन्वॉल्मेंट असेल तर ठाकरे परिवारालाही सोडणार नाही. मात्र ओढून ताणून ठाकरे परिवाराला त्यात गुंतवायचं असंही करणार नाही, असं फडणवीस म्हणाले.  


कोव्हिड काळात घोटाळा


सूरज चव्हाण प्रकरणात भ्रष्टाचार झालाय. कोव्हिड काळात बॉडी बॅगमध्ये घोटाळा झालाय. 600 रुपयांची बॉडी बॅग 6 हजार रुपयांची झाली.  कोव्हिड सेंटरमध्ये घोटाळा झालाय. हा भ्रष्टाचार झालाय तो हैराण करणारा आहे. याची पाळमुळं जिथे पोहोचतील, त्यांच्यावर कारवाई करु. यामध्ये जर ठाकरेंचं नाव आलं तर त्यांच्यावरही कारवाई होईल, असं फडणवीस म्हणाले.  


भ्रष्टाचाराविरोधात बीएमसीवर ठाकरे गटाचा मोर्चा हा म्हणजे सर्वात मोठा ज्योक आहे, असंही फडणवीसांनी नमूद केलं.


पक्षाने चपरासी होण्यास सांगितलं तरी होईन!


मी सध्या जो काही आहे, ते माझ्या पक्षामुळे आहे. माझ्यातून पक्ष वगळला तर मी काहीही नाही. त्यामुळे पक्षादेश माझ्यासाठी अंतिम आहे. पक्षाने मला चपरासी बनायला जरी सांगितलं तरी होईन, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


उपमुख्यमंत्रिपद हा माझ्यासाठी धक्का होता!


एकनाथ शिंदे गट जेव्हा सोबत आला तेव्हा त्यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आलं. त्यावेळी मी या सरकारमध्ये नसेन असं सांगितलं होतं. मात्र पक्षाने आदेश दिल्याने मी सहभागी झालो. मात्र उपमुख्यमंत्रिपद हा माझ्यासाठीही शॉक होता हे मी मान्य करतो. पक्ष चालवण्याच्या मानसिकतेत मी होतो. त्यामुळे पदापासून लांब राहण्याच्या विचारात होतो. पण पक्षाने मला उपमुख्यमंत्री होण्यास सांगितलं. पण आता मागे वळून पाहिल्यास, पक्षाने योग्य निर्णय घेतल्याचं सिद्ध झालं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


अजित पवार हा भविष्यातील प्लॅन आहे का? 


आम्ही एकमेकांना भेटतो, बोलतो, त्याचा अर्थ प्लॅन बी आहे असं नाही. अजित पवार विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे ते मला, मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. याचा अर्थ आम्ही त्यांच्यासोबत किंवा ते आमच्यासोबत येत आहेत असं नाही, असं फडवीसांनी सांगितलं. 


एक जमाना होता ज्यावेळी मी म्हटलं होतं आम्ही कधीही राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, पण मला २०१९ मध्ये जावं लागलं..  राजकारणात त्या त्या वेळची परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. पवार सध्या काँग्रेससोबत आहेत. त्यांना आम्ही हरवू आणि पुन्हा जिंकून येऊ, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.  


शरद पवार मंजे हुए खिलाडी 


शरद पवार हे मंजे हुए खिलाडी अर्थात मुरलेले राजकारणी आहेत. राष्ट्रवादी पक्ष हे तेच चालवतात. त्यामुळे त्यांच्या पक्षाचे सर्व निर्णय हे त्यांच्या सहमतीनेच होतात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


राजकारणात जिवंत राहणं गरजेचं


राजकारणात जिवंत राहणं गरजेचं असतं. तरच तुम्ही पुढचं  राजकारण करु शकता. मी जगातला सर्वात इमानदार माणूस आहे असं नाही. मी सुद्धा कॉम्प्रमाईज करतो... पण मला मर्यादा कळते. जर उद्धव ठाकरे बेईमानी करुन माझ्यावर मात देऊ इच्छितात तर मी अजित पवारांना सोबत घेऊन त्यांना उत्तर देऊ शकतो कारण मला राजकारणात जिवंत राहायचं आहे..त्यामुळे कॉम्प्रमाईज करावे लागतात. मात्र कॉम्प्रमाईज ही पॉलिसी नाही. ती त्यावेळची परिस्थिती असते. 
आम्ही कॉम्प्रमाई करु शकतो, पण आम्ही MIM, मुस्लिम लीग यांच्यासोबत करु शकत नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


समान नागरी कायदा होणार


अटलजींनी २२ पक्षांसोबत सरकार चालवलं. त्यावेळी त्यांनाही आमच्या विचारधारेवरुन प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं, आमचं बहुमताचं सरकार येईल तेव्हा आम्ही निर्णय घेऊ. आम्ही बहुमताने सत्तेत आल्यानंतर मोदीजींनी निर्णय घेतले, 370 हटवलं, राम मंदिर पूर्णत्वास जात आहे. इतकंच काय तर समान नागरी कायदा सुद्धा होणार,  असं फडणवीसांनी सांगितलं. 


संबंधित बातम्या


पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचा डाव, त्यांनी आमचा डबलगेम केला: देवेंद्र फडणवीस